‘बाहुबली २’ या चित्रपटाचीच सर्वदूर चर्चा सुरु असताना आता मात्र या चित्रपटातील कलाकारांनी स्वत:साठी वेळ काढण्यास सुरुवात केली आहे. सलग पाच वर्षे या चित्रपटासाठी खर्ची घालणारा अभिनेता प्रभासही सध्या अमेरिकेत सुटट्यांचा आनंद घेतोय.

‘बाहुबली २’च्या चित्रीकरणादरम्यान अनुपमा चोप्रासोबतच्या एका मुलाखतीमध्ये प्रभासने तो लवकरच सुट्टीवर जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. सलग पाच वर्षे एका चित्रपटासाठी इतकी मेहनत घेतल्यावर ‘ब्रेक तो बनता है’.. मग त्यात प्रभासही मागे नाही. सध्या प्रभास त्याच्या मित्रमंडळींसह अमेरिकेला रवाना झाला आहे. प्रभास या सुट्टीवरुन थेट जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मायदेशी परतणार आहे.

प्रभास आणि ‘बाहुबली २’ चित्रपटाशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रभास काही दिवसांचा वेळ काढून चित्रीकरणातून ब्रेक घेत असे. पण, अशा मोठ्या सुट्टीवर तो गेल्या पाच वर्षांपासून गेला नाहीये. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याने सर्वप्रथम वेळात वेळ काढून सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. प्रभास दर उन्हाळ्यात अशा प्रकारच्या सुट्टीवर जातो. पण, त्याच्या या कार्यक्रमात गेल्या काही वर्षांपासून व्यत्यय आला होता, अर्थात तो व्यत्यय त्याच्या कामामुळेच होता. आता मात्र राहिलेली सर्व सर तो या सुट्टीमध्ये भरून काढणार आहे असंच म्हणावं लागेल.

वाचा: ‘बाहुबली २’ ते ‘२.०’ हे आहेत भारतालील सर्वात महागडे चित्रपट

अमेरिकेहून मायदेशी परतल्यानंतर प्रभास पुन्हा एकदा त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होणार आहे. मुख्य म्हणजे ‘साहो’ या अॅक्शनपटातून प्रभास पुन्हा एकदा थरारदृश्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ‘साहो’ हा चित्रपटही विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीही सध्या विविध तंत्र अवलंबण्याचा विचार केला जात आहे.

वाचा: …या पाच कारणांमुळे बॉलिवूडमध्ये कधीच बनणार नाही ‘बाहुबली’सारखा सिनेमा