भारत आणि पाकिस्तानमध्ये उरी हल्ल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर भारतातील चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यास बंदी घालण्याच आली होती. तसेच, पाकिस्तानमधील कोणत्याही कलाकाराला भारतात काम करण्यास बंदी होती. मात्र, या बंदीनंतर आता बॉलीवूडमध्ये नुकतेच प्रदर्शित झालेले ‘काबिल’ आणि ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सर्जिकल स्ट्राइकच्या बंदीनंतर पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणारे हे पहिलेच बॉलीवूडपट असतील.

भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर तेथे बॉलीवूड चित्रपट दाखविण्यास मनाई करण्यात आली होती. पण, पाकिस्तानमधील चित्रपटगृह मालकांना तेथील लोकल चित्रपटांमुळे फार काही नफा होत नाही. त्यामुळे त्यांना बॉलीवूडपटांवरच अवलंबून राहावे लागते. दरम्यान, तेथील चित्रपटगृह मालकांनी सरकारला भारतीय चित्रपट दाखवू द्यावे अशी विनंती केली आहे. त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी गेल्या आठवड्यात सर्व भागधारकांशी सल्लामसलत करण्याकरिता एक समिती स्थापन केली.

क्विंट या संकेतस्थळाला माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर समितीच्या प्रमुखपदी राज्यमंत्री मरयम औरंजगजेब आणि शरिफ यांचे सल्लागार इरफान सिद्दिकी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने पंतप्रधान सचिवालयाकडे सदर बंदी उठविण्याची शिफारस केली आहे. पंतप्रधानांची परवानगी मिळताच माहिती मंत्रालय हे भारतीय चित्रपट दाखविण्याची परवानगी असल्याचे पत्रक जाहीर करेल.

शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिची देखील मुख्य भूमिका आहे. तर ‘काबिल’ चित्रपटात हृतिक रोशनची मुख्य भूमिका आहे. हम एन्टरटेंमेन्टची उपकंपनी असलेली हम फिल्म्स हे दोन्ही चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. आम्हाला चित्रपट दाखविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळताच अवघ्या दोन दिवसांमध्ये आम्ही भारतीय चित्रपट दाखविण्यास सुरुवात करू. सर्व काही नीट झालं तर आठवड्याच्या शेवटी आपण चित्रपट बघू शकू, असे हम फिल्म्सच्या अधिका-यांनी म्हटले आहे.

भारतीय चित्रपटाला पाकिस्तानमध्ये बंदी घातल्याने तेथील चित्रपटगृह मालकांना बराच तोटा सहन करावा लागत आहे. पाकिस्तानमध्ये तेथील चित्रपटांच्या तुलनेने बॉलीवूडपटांना जास्त मागणी आहे.