सध्या संपूर्ण देशात करोनाचे सावट पाहायला मिळते. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशातच सेलिब्रिटीदेखील करोनाच्या रडारवर आहेत. अलिकडेच अभिनेता टॉम हँक्स, क्रिस्तोफर हिव्ह्यू, अभिनेत्री रीटा विल्सन, ओल्गा कुरिलेन्कोने, फूटबॉलपटू कॅलम हडसन-ओडोई, स्पेन संसदेतील खासदार आयरेन माँटेरो यांना करोना झाल्याची माहिती समोर आली होती. या यादीमध्ये प्रसिद्ध अभिनेता एद्रिस एल्बाचे नाव आले. आता एल्बाने त्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.

एद्रिसने लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे चाहत्यांशी संवाद साधून त्यांचे आभार मानले. ‘कालचा दिवस चांगलाही होता आणि वाईटही होता. तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ कळत असेलच. वाईट या कारणामुळे होता की माझी करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. आणि चांगला यासाठी की मी या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधत आहे. पण ती चाचणी करतानाचे २४ तास वेड लावणारे होते’ असे त्याने म्हटले.

मला आता बरं वाटत आहे. आज सकाळी मी उठलो तेव्हा मला काही जाणवले नाही. पण माझ्या आवाजात थोडा थकवा जाणवत होता. पण माझी नीट झोप न झाल्याने तो कदाचित जाणवत असेल. आता ही मला कोणती लक्षणे जाणवत नाहीत. दिवसातून दोन वेळा ताप किती आहे हे मी पाहत असतो. पण आता मला बरं वाटत आहे असे एद्रिस पुढे म्हणाला.