१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. त्यामुळे हा दिवस संपूर्ण भारतासाठी काळा दिवस ठरला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी, पाकिस्तानसोबतच असलेले सगळे संबंध संपविण्याचा प्रयत्न देशवासीयांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या घटनेचा परिणाम कलाविश्वावर सर्वाधिक झाला असून कलाक्षेत्रातील अनेक पाकिस्तानी गायक, अभिनेता, अभिनेत्री यांची बॉलिवूडमधून गच्छंती झाल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानमध्ये बॉलिवूडमधील काही चित्रपटांच्या प्रदर्शनावरही बंदी घालण्यात आली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘लुका छुपी’ आणि दलजीत दोसन्जचा ‘अर्जुन पटियाला’ हे दोन्ही चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाहीत. चित्रपट निर्माता दिनेश विजान यांनी ही घोषणा केली असून पाकिस्तानी वितरकांसोबत झालेला करारही त्यांनी रद्द केल्याचं सांगण्यात येत आहे. त्याप्रमाणेच ‘मेड इन चाइना’ हा चित्रपटही आता पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटांची मॅडॉक फिल्म्स या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आली आहे.

यापूर्वीच अजय देवगणने त्याचा ‘टोटल धमाल’ हा आगामी चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाप्रमाणेच सुशांत सिंग राजपूतची मुख्य भूमिका असलेला ‘सोन चिडिया’ हा चित्रपटही पाकिस्तानी प्रेक्षकांना पाहता येणार नाहीये. या दोन्ही चित्रपटांच्या मेकर्सनी आपले चित्रपट पाकिस्तानात रिलीज न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

‘सोन चिडिया’ हा चित्रपट चंबळच्या खो-यातील दरोडेखोरांच्या आयुष्यावर आधारित असून अभिषेक चौबे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर हिंदी मीडियम’ आणि ‘स्त्री’सारखे चित्रपट दिल्यानंतर मडॉक फिल्म ‘लुकाछुपी’ हा नवा चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही प्रथमच एकत्र झळकणार आहे.

दरम्यान, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पॉईजने पाकिस्तानच्या कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. म्युझिक कंपनी टी-सीरिजनेही पाकिस्तानी गायकांनी गायलेली गाणी हटवली आहेत. यात पाकिस्तानी गायक आतिफ असलम आणि राहत फतेह अली खान अशा गायकांचा समावेश आहे. पुलवामा येथील भ्याड हल्ल्याची बॉलिवूडमधील अनेकांनी निंदा केली आहे. तसंच काहींनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देखील दिला आहे.