हॉलिवूडमधल्या अनेक बड्या अभिनेत्रींनी निर्माता हार्वी वीनस्टीनने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. सोशल मीडियावर तर #MeToo हा हॅशटॅग अनेक दिवस ट्रेंडही होत होता. या हॅशटॅग अंतर्गत अभिनेत्रींनी त्यांचा लैंगिक शोषणाचा अनुभव शेअर केला होता. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने एका मुलाखतीत लष्करातील जवान तिच्या शरीराकडे वाईट नजरेने पाहत होता असे विधान दिले होते.

विद्याच्या या विधानानंतर एक वेगळाच वाद सुरू झाला. ‘आज तक’ने प्रदर्शित केलेल्या वृत्तानुसार सोशल मीडियावर ‘युथ बीजेपी’ नावाच्या पेजवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये एक सैनिक विद्याला उत्तर देताना दिसतो. व्हिडिओमध्ये जी व्यक्ती दाखवण्यात आली आहे त्याने लष्कराचा ड्रेस घातला असून तो कवितेमार्फत विद्याला उत्तर देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये वापरले गेलेले शब्द फार आक्षेपार्ह आहे. व्हिडिओत दिसणारी व्यक्ती खरोखरची जवान आहे की नाही हेही अजुनपर्यंत कळू शकलेले नाही. या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी या व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवर आक्षेप नोंदवला आहे. या व्हिडिओत ती व्यक्ती विद्यावर खूप अश्लिल आरोप करताना दिसते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिनेमांमध्ये महिला म्हणजे फक्त एक लक्षवेधी वस्तू म्हणून सादर न करता तिला स्वत:चं अस्तित्व असतं या विचारावर ठाम असणाऱ्या विद्याला हार्वी विनस्टीनविषयी तिचं मत विचारलं असता ती म्हणाली होती की, ‘बऱ्याच वर्षांपासून हार्वी विनस्टीन अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करतो आहे ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. त्यातही ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने या सर्व प्रकरणाला वाचा फोडेपर्यंत या धाडसी आणि कर्तृत्त्ववान महिलांपैकी कोणीही याची वाच्यता केली नाही, हे तर सर्वात जास्त धक्कादायक. तो हॉलिवूडमधील एक ख्यातनाम निर्माता आहे. पण, त्याने केलेल्या लैंगिक अत्याचारांची वाच्यता न करता इतकी वर्षे हा सर्व प्रकार उघड करणं एकाच गोष्टीकडे लक्ष वेधत आहे की, आयुष्यात कितीही यश संपादन केलं तरीही लैंगिक अत्याचारांविषयी उघडपणे बोलण्यास महिलांना आजही असुरक्षित वाटतं.’