‘झी मराठी’वरील ‘अगं बाई सासूबाई’ मालिका सध्या प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली आहे. अभिजीत राजेंनी आपल्या भावना आसावरीपुढे व्यक्त केल्याने आता त्यांच्या नात्याचे काय होणार?, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. परंतु अभिजीत आणि आसावरीची ‘प्रेमकथा’ सध्या कोकणातील आकेरी येथे रंगताना दिसत आहे.

सावंतवाडी येथील आकेरी गाव म्हटले की ‘रात्रीस खेळ चाले’ हे समीकरण रुढ झाले आहे. गेले काही वर्ष या मालिकेचे चित्रिकरण आकेरी गावात सुरु असल्याने अनेक पर्यटकही आवर्जून आकेरीला भेट देतात. आता ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेपाठोपाठ ‘अगं बाई सासूबाई’ मालिकेनेही आकेरीत धाव घेतली आहे. सध्या मालिकेत अभिजीत आणि आसावरी यांच्यामध्ये नव्याने सुरु झालेल्या प्रेमाबद्दल आसावरीच्या मुलाला म्हणजेच सोहमला समजते. त्यामुळे आईला यातून बाहेर काढण्यासाठी तो तडक तिला गावी पाठवण्याचा निर्णय तो घेतो. आिंण आजोबांच्या सांगण्यावरुन तो स्वत: आईसोबत गावी जातो. असा काहीसा कथाभाग असणार आहे. परंतु आईला अभिजीत राजेंपासून दूर ठेवण्याचा सोहमचा खेळी यशस्वी होईल का, की गावीही अभिजीत आसावरीची भेट होईल, तिथे नक्की काय घडेल हे येणाऱ्या भागात प्रेक्षकांना कळेलच. परंतु या निमित्ताने पुन्हा एकदा मालिका विश्वाची वाट आकेरीत वळली. हा विशेष भाग चित्रित करण्यासाठी मालिकेच्या सर्व चमूने गेली काही दिवस सावंतवाडीतील आकेरी गावात तळ ठोकला होता. त्यामुळे या भागात आकेरीतील स्थानिकांचाही ओझरता सहभाग दिसेल. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले आके री गाव ‘अगं बाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.

‘कोकणातील निसर्गसौंदर्य प्रत्येकालात भावणारे असल्याने या विशेष भागाचे चित्रिकरण कोकणात व्हावे असा मानस होता. ‘रात्रीस खेळ चाले’या मालिकेच्या चित्रिकरण आकेरीत सुरु असल्याने तिथल्या गावक ऱ्यांचे खूप सहकार्य लाभते. म्हणून आकेरी गावाची निवड करण्यात आली. शिवाय सावंतवाडीतील इतर गावांमध्येही चित्रिकरण करण्यात आले असून यानिमित्ताने कलाकारांना आणि प्रेक्षकांनाही थोडा बदल अनुभवता येईल’, असे मालिकेचे निर्माते सुनील भोसले यांनी सांगितले.