01 March 2021

News Flash

‘अग्निहोत्र २’मधील रश्मी सांगतेय तिच्या अनपट या आडनावामागचा किस्सा

रश्मीने 'अग्निहोत्र २'च्या सेटवरील गमतीजमती सांगितल्या

रश्मी अनपट

‘अग्निहोत्र २’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री रश्मी अनपट पुनरागमन करतेय. यानिमित्ताने तिच्याशी साधलेला खास संवाद…

‘अग्निहोत्र २’ मधून तू नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत त्याविषयी काय सांगशील?

खरंतर एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचा मी भाग आहे याचा आनंद आहे. या मालिकेत मी अक्षरा ही व्यक्तिरेखा साकारतेय. अतिशय शांत, साधी ,सरळ आणि आपल्या तत्वांशी ठाम असणारी ही मुलगी आहे. अक्षराच्या वडिलांच्या बाबतीत एक घटना घडलीय ज्याचा संबंध वाड्याशी आहे. अक्षराला पडलेल्या याच प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी ती अग्निहोत्री वाड्यात येते आणि तिथूनच तिचा पुढचा प्रवास सुरु होतो. ही गोष्ट नव्या पीढीची असल्यामुळे पहिलं पर्व जरी प्रेक्षकांनी पाहिलेलं नसलं तरी हरकत नाही. नव्या पीढीची नवी गोष्ट ‘अग्निहोत्र २’ मधून उलगडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हे नवं पर्व तितकाच आनंद देईल याची खात्री आहे.

पहिल्या पर्वाप्रमाणेच ‘अग्निहोत्र २’ मध्येही दिग्गज कलाकार आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

प्रचंड दडपण होतं. शरद पोंक्षे, राजन भिसे, अनुराधा राजाध्यक्ष असे अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची प्रचंड भीती वाटत होती. मात्र शूटिंगच्या पहिल्या दिवशी मात्र माझं टेन्शन पळून गेलं. सेटवर सर्वांनीच मला आपलंसं करुन घेतलं. त्यामुळे सीन करणं सोपं गेलं. राजन भिसे या मालिकेत माझ्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासोबत माझे बरेचसे सीन होतात. सेटवरही आता आमची छान मैत्री जमलीय. राजन काका माझ्यासाठी घरचा डबा घेऊन येतात. शूटिंगमधल्या ब्रेकमध्ये आमच्या गप्पाही रंगतात. शरद पोंक्षे सरांकडूनही मला खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. त्यामुळे अग्निहोत्र २ च्या निमित्ताने मला नवं कुटुंब मिळालं आहे असं म्हणायला हवं.

तुझ्या अनपट आडनावामागे एक किस्सा आहे त्याविषयी काय सांगशिल?

माझ्या आडनावाविषयी बऱ्याच जणांना कुतुहल असतं. त्यामागचं कारणही तितकंच रंजक आहे. माझ्या खापर पणजोबांच्या काळात आमच्या घरी अन्नपट चालवला जायचा. तेव्हा अक्षरश: अन्नाचे पाट असायचे. त्यामुळेच आमचं नाव अनपट झालं. पुढे ते अनपट-भोसले असं झालं. फलटणजवळच शिंदेवाडी हे आमचं गाव आहे. हा सगळाच परिसर असा ऐतिहासिक घटनांनी भारलेला आहे.

‘अग्निहोत्र २’ मधून तू पुन्हा मालिकाविश्वात पुनरागमन करत आहेस, त्याविषयी…

मी २ वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करतेय याचा आनंद होतो आहे. मला छोटा मुलगा आहे. त्यामुळेच मी दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. पण माझा नवरा समीर, आई-बाबा, सासू-सासरे यांच्या पाठिंब्यामुळेच मी माझ्या करिअरला नव्याने सुरुवात करु शकले. ‘अग्निहोत्र २’ सारखी संधी मिळाल्यामुळे ती मी स्वीकारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 6:04 pm

Web Title: agnihotra 2 actress rashmi anpat tells the story behind her surname ssv 92
Next Stories
1 महेश कोठारेंच्या सुनेनं केला मेकओव्हर; बघून अभिनेत्रीही झाल्या अवाक्
2 “मला घरी जाऊन मार खावा लागेल”; सुधा मूर्तींच्या उत्तरावर बिग बींची प्रतिक्रिया
3 दुसऱ्या संधीसाठी कायम कृतज्ञ राहीन- मनिषा कोइराला
Just Now!
X