राज्यसभेत प्रचंड गदारोळात कृषि विषयक दोन विधेयके मंजूर झाली. ही विधेयकं राज्यसभेत मांडल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड विरोध केला. तर, दिल्ली, हरयाणा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आले. या विधेयकांच्या मंजूरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना ‘एमएसपी’बद्दल ग्वाही देखील दिली. यावर आता अभिनेत्री कंगना रणौत हिने मोदींच्या ट्विटला रिट्विट करत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले व या विधेयकांना विरोध करणाऱ्यांवर टीका केल्याचे दिसून आले आहे.

“प्रधानमंत्रीजी कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, ज्याला गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं नाटक करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत. त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहे CAA मुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले. अशा शब्दांमध्ये ट्विट करत कंगना रणौतने या विधेयकांचा विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

राज्यसभेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी ही दोन्ही विधेयके आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आली. ही विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सभागृहात मांडली. चर्चेवेळी विरोधकांनी विधेयकांनी प्रचंड विरोध करत घोषणाबाजी केली. या गदारोळातच विधेयक मंजूरीसाठी आवाजी मतदान घेण्यात आलं.

ही विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्था कायम राहणार असल्याची ग्वाही दिली. “मी आधीही बोललो आहे. पुन्हा एकदा सांगतो एमएसपी व्यवस्था कायम राहिल. सरकारी खरेदी कायम राहिल. आम्ही इथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी शक्य होईल तितके प्रयत्न करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचं जगणं अधिक सुखकर करू,” असं मोदी यांनी म्हटलं आहे.