बॉलिबूडचा सिंगर मिका सिंग हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच एका मोठ्या लग्नात त्याने परफॉर्मन्स दिला होता. त्याचा त्या लग्नाच्या एका समारंभातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याने पाकिस्तानातील कराचीत जाऊन हा परफॉर्मन्स दिल्याने त्याला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. एकीकडे पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी घातली असताना मिकाने पाकिस्तानात जाऊन दिलेल्या परफॉर्मन्सवर आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने (AICWA) मिकावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने (AICWA) मिकावर बंदी घालत त्याला चित्रपटसृष्टीतून बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. मिकाने 8 ऑगस्ट रोजी कराचीमध्ये एका अब्जाधीशाच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात परफॉर्म केले होते. हा कार्यक्रम पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकांचा असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता सर्व प्रोडक्शन हाऊस, म्युझिक कंपनी आणि ऑनलाइन म्युझिक कंटेंट प्रोव्हाडर्सने मिकावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानमधील पत्रकार नायला इनायत यांनी एक व्हिडीओ ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मिकाचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. काही नेटकऱ्यांनी एकीकडे आपले जवान देशाचं संरक्षण करताना शहिद झाले, तर दुसरीकडे मिका हा पैशासाठी पाकिस्तानला गेल्याची टीका केली.