ऐश्वर्या राय बच्चन ७१ व्या कान चित्रपट महोत्सवात मुलगी आराध्यासोबत पोहोचली. कान महोत्सवाला जाण्यापूर्वी ऐश्वर्याने तिच्या चाहत्यांना फार सुंदर भेट दिली. ही भेट म्हणजे नेहमीच सोशल मीडियापासून दूर राहणारी ऐश्वर्याला आता इन्स्टाग्रामवर पाहता येणार आहे. ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर तिचा पहिला फोटो आराध्यासोबतचा शेअर केला आहे. यानंतर मातृदिनाचे औचित्य साधून तिने आराध्यासोबतचा एक व्हिडिओही शेअर केला.

कान महोत्सवात तिच्या दुसऱ्या पेहरावावेळी तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला ‘जीवनचक्र’ असे कॅप्शन दिले. यापूर्वी शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये नवजात आराध्या दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘माझा पुन्हा एकदा जन्म झाला आहे.’ आतापर्यंत ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवर अभिषेक बच्चन, सोनम कपूर अहूजा, दिया मिर्जा, अर्जुन कपूर, शेखर रविजानी, शिबानी दांडेकर, रितेश देशमुख यांसारख्या अनेक कलाकारांनी फॉलो केले आहे.

जसजशी तिच्या चाहत्यांना या अकाऊंटविषयी माहिती मिळत आहे, त्या सर्वांनी ऐश्वर्याला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. एका दिवसांतच तिला ३० हजारांहून अधिक फॉलोवर्स आले असून अजूनही चाहते तिच्या या अकाऊंटला फॉलो करत आहेत. शुक्रवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर फोटो टाकायला सुरूवात केली.

अपेक्षेनुसार फार फॉलोवर्स न आल्यामुळे तिने तिच्या पीआर टीमला खडे बोल सुनावले असेही म्हटले जात आहे. ब्ल्यू टिक न मिळाल्यामुळेच ती रागावली असल्याचे बोलले जात आहे. पण आता ऐश्वर्याच्या अकाऊंटला ब्ल्यू टिक आली आहे. त्यामुळे आता तरी तिचा जीव भांड्यात पडला असेल असेच वाटते.