‘एखाद्या महिलेला कामासाठी तडजोड करावी लागत असेल, तिच्या अस्तित्त्वालाच आव्हान दिलं गेलं असेल तर याबाबत तिनं पुढे येऊन बोलणं, व्यक्त होणं खरंच कौतुकास्पद आहे,’ असं मत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने मांडलं. जगभरात गाजलेल्या ‘मी टू’ (#MeToo) या चळवळीला पाठिंबा देत तिने महिलांना खुलेपणानं बोलण्याचं आवाहन केलं. पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत सिडनीला व्यावसायिक कामानिमित्त गेली असता तिथल्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने तिचं मत मांडलं.

हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीनविरोधात काही अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. यानंतरच सुरू झालेल्या ‘मी टू’ या मोहिमेने संपूर्ण समाजमाध्यम क्षेत्र दणाणून सोडलं. ज्या महिला वर्षांनुवर्षे पुरुषी अत्याचाराला बळी पडत होत्या, परंतु केवळ मनात खोलवर रुजलेल्या भीतीपोटी त्या कोणासमोर व्यक्त होत नव्हत्या. त्यांनीही ‘#MeToo’ या मोहिमेअंतर्गत अन्यायाविरोधात जोरदार आवाज उठवला.

वाचा : ‘टी सीरिज’सोबत अक्षय पुन्हा कधीच काम करणार नाही?

”ति’च्या व्यक्त होण्यानेच अनेकजण खडबडून जागे झाले आणि दुष्कृत्य करणाऱ्यांचा चेहरा सर्वांसमोर आला. फक्त चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील महिलांनी अत्याचाराविरोधात आवाज उठवावा. या मोहिमेमुळे संवाद वाढला आणि लोकं बोलू लागली हीच चांगली गोष्ट आहे. हा एक सकारात्मक बदल आहे,’ असं ऐश्वर्या म्हणाली.

वाचा : चर्चगेट रेल्वे स्थानकावर रणवीरचा फेरफटका

हॉलिवूडसोबतच बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी या मोहिमेला साथ दिली. याआधी शाहरुख खान, सलमान खान, रिचा चड्ढा, इलियाना डिक्रूझ, इरफान खान यांसारख्या सेलिब्रिटींनी कास्टिंग काऊचबद्दल त्यांचं मत मांडलं आहे.