अभिनेता अजय देवगण सध्या चांगलाच चर्चेत आलाय. अजय देवगणची ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमात मुख्य भूमिका आहे. या सिनेमाच्या शूटिंगला त्याने सुरूवात केलीय. मात्र शूटिंगला जात असताना अजय देवगणला आज काही शेतकऱ्यांनी अडवलं. या घटनेनंतर अजय देवगण ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये असून ट्विटरवर #अजय देवगण कायर है’ हा ट्रेंड पाहायला मिळतोय.

फेब्रुवारी महिन्यात अजय देवगणने शेतकरी आंदोलना संदर्भात एक ट्विट केलं होतं. ज्यात त्याने “हा सगळा खोटा प्रचार आहे.” असं म्हंटलं होतं. त्याच्या या ट्विटमुळे अनेक शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.  शंभर दिवस उलटूनही अजयने शेतकऱ्यांच्या समर्थनात आपली भूमिका मांडलेली नाही. त्यामुळेच आज सकाळी अजय देवगण मुंबईच्या फिल्मसिटीकडे जात असताना एका अज्ञातानं त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. डीएनए इंडियाने हे वृत्त दिलं असून या वृत्तानुसार, राजदीप सिंग असं या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यानंतर या व्यक्तीला सोडून देण्यात आलं आहे.

अजय देवगण फिल्मसिटीकडे जात असताना राजदीपने त्यांची गाडी अडवून त्यांना शेतकरी आंदोलनावर भाष्य करायला सांगितलं. शेतकरी आंदोलनाला शंभरहून अधिक दिवस झाले तरी अजयने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कोणतंही मत व्यक्त केलं नाही म्हणून त्याने अजय यांची गाडी अडवून त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी राजदीपला ताब्यात घेतलं.राजदीप फक्त अजयशी शेतकऱ्यांच्या हक्काप्रकरणी बोलण्यासाठी गेला होता. असं त्याच्या एका मित्राने म्हंटल आहे.

या सर्व घटनेनंतर अजय देवगणला ट्विटरवर ट्रोल केलं जातंय. त्यामुळेचं #अजय देवगण कायर है हा ट्रेंड ट्विटरवर पाहायला मिळतोय. हरमिंदर सिंह या युजरने ‘लाज वाटली पाहिजे’ असं म्हणत अजयचा एक फोटो ट्विट केलाय. तर एका युजरने ‘प्रश्न उपस्थित केल्याने अटक केली जाते. बघा पुढे काय होतं.’ असं ट्विट केलंय.

“पडद्यावरचे हे हिरो खऱ्या आयुष्यातील हिरोंपुढे झीरो आहेत” असं ट्विट एका युजरने केलंय. या घटनेनंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी अजय देवगण आणि  सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे.