अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ला ‘जब तक है जान’शी झुंज द्यावी लागली तरी या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात यश मिळवले. त्यामुळे, सलग तिसरा हिट चित्रपट अजय देवगणच्या नावावर जमा झाला आहे. आपल्याला मिळालेले यश टिकवायचे असेल तर काहीतरी नवीन प्रयोग करत राहायला हवेत, हे जाणून असणाऱ्या अजयने ‘हिम्मतवाला’ या आगामी चित्रपटासाठी वाघाशी दोन हात करायचा निर्धार केला आहे.
‘सिंघम’मध्ये अजयची प्रतिमा सिंहासारखाच निधडय़ा छातीचा नायक म्हणून रंगवण्यात आली होती. प्रेक्षकांनी या बाजीराव सिंघमला डोक्यावर घेतले. मात्र, ‘हिम्मतवाला’साठी काहीतरी रसरशीत अ‍ॅक्शन अजयला अपेक्षित होती. सध्या ऑस्कर विजेता दिग्दर्शक अँग लीच्या ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटातील बंगाली वाघ ‘रिचर्ड पारकर’ लोकप्रिय झाला आहे. त्याच धर्तीवर ‘हिम्मतवाला’मध्ये बंगाली वाघाशी दोन हात करण्याचा प्रसंग चित्रित केला जावा, अशी इच्छा अजयने निर्माता साजिद नाडियादवालाकडे व्यक्त केली. साजिदलाही अजयची कल्पना पसंत पडली. मात्र, अशाप्रकारे वाघाचे दृश्य चित्रित करायचे तर प्रशिक्षित वाघाची गरज होती. त्यासाठी त्यांनी तडक मॉरिशस गाठले आहे.
भारतात प्राण्यांच्या चित्रिकरणासाठी काटेकोर कायदे आहेत. मॉरिशसमध्ये असे नियम नाहीत. शिवाय, तिथे प्राण्यांना स्टंट दृश्यांसाठी प्रशिक्षित करणारी संस्थाही असल्याने त्यांच्या मदतीने चित्रिकरण करण्याचा निर्णय अजयने घेतला आहे. ‘हिम्मतवाला’ हा १९८३ मध्ये आलेल्या चित्रपटाचा रिमेक आहे. के. रघुवेंद्र राय दिग्दर्शित या चित्रपटात जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिका होत्या. आगामी ‘हिम्मतवाला’चे दिग्दर्शन साजिद खान करणार असून अजय आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या यात प्रमुख भू्मिका आहेत.
जुन्या ‘हिम्मतवाला’मध्ये वाघाशी दोन हात करण्याचा प्रसंग जितेंद्रवर ओढवला नव्हता. पण, आपली नायकाची ‘सिंघम’ प्रतिमा अबाधित रहावी, यासाठी अजयने हा प्रसंग स्वत:वर ओढवून घेतला आहे. ‘मिस्टर नटवरलाल’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अशाचप्रकारे सर्कशीतील एका वाघाशी झुंज दिली होती. त्याच प्रसंगावरून प्रेरित होऊन अजयने निर्माता आणि दिग्दर्शकाला असे दृश्य चित्रित करण्याची गळ घातली आहे.
सुरूवातीला हे दृश्य कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या सहाय्याने चित्रित करण्याचा साजिदचा मानस होता. मात्र, अजयने आपण स्टंटमॅनची मदत न घेता हे दृश्य करणार असल्याचे सांगितल्यावर त्याप्रमाणे तयारी सुरू झाली आहे. ‘हिम्मतवाला’मधील  बंगाली वाघ अजयला शंभर कोटी रुपये मिळवून देतो का हे पहायचे!