देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड क्षेत्रातील अनेक कलाकार करोना पिडीतांच्या मदतीला धावून येत आहेत. सोनू सूद, सलमान खान, आलिया भट. अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना पाठोपाठ आता बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणने देखील मदतीचा हात पुढे केलाय.

गेल्या वर्षी अजय देवगण याने धारावीच्या कोव्हिड सेंटरमध्ये २०० बेड्ससाठी ऑक्सिजन सिलेंडर्स आणि दोन पोर्टेबल व्हेंटिलेटर दान केले होते. त्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण शिवाजी पार्क इथे बनत असलेल्या कोरोना सेंटरसाठी मदत करतोय.

मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क इथल्या भारत आणि स्काऊट गाईड्स हॉल इथे २० बेड्सचे कोरोना सेंटर उभारण्याचा निर्णय घेतलाय. यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सपोर्ट आणि इतर सर्व सुविधांचा समावेश आहे. या सेंटरच्या स्थापनेसाठी अजय देवगणने त्याची सामाजिक संस्था ‘एनवाय फाउंडेशन’ च्या माध्यमातून १ करोड रूपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलाय.

करोनाच्या या कठीण काळात बॉलिवूडकर हळुहळु मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कुणी कोरोना पिडीतांच्या जेवणाची सोय उपलब्ध देतंय, तर कुणी ऑक्सिजन सिलेंडर्स दान करतंय. हे सगळे कलाकार सध्याच्या परिस्थितीत कोरोना पिडीतांसाठी देवदूत ठरत आहेत.