गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर आता जगभरात चर्चा सुरू आहे. या आंदोलनामुळे बॉलिवूडचे दोन भाग झाले असल्याचे म्हटले जाते. त्यात बॉलिवूड आणि पंजाबी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार एकमेकांच्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत. अमेरिकन पॉपस्टार सिंगर रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनमध्ये केलेल्या ट्वीटनंतर बॉलिवूड कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात अभिनेता अजय देवगणने केलेल्या ट्वीटवरून त्याला पंजाबी सिंगर जॅज धामीने ट्रोल केले आहे.

“भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध सुरु असलेल्या कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. अशा परिस्थितीत भांडण करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे” असे ट्वीट अजयने केले होते.

अजयच्या या ट्वीटला पंजाबी गायक जॅज धामीने रिट्वीट करत उत्तर दिले आहे. “चमचा, तुझ्यासाठी आरामात बसून ट्वीट करणे सोपे आहे. फक्त एक दिवस त्या कडाक्याच्या थंडीत तुझ्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांना पाठव मग तुला समजेल की ते कोणत्या परिस्थित राहत आहेत. दु:खाची गोष्ट म्हणजे रिहानासारख्या ग्लोबल स्टारने तुमचे डोळे उघडले” अशा आशयाच ट्वीट करत जॅजने अजयला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा- “एका ट्विटमुळे तुमच्या ऐक्याला बाधा पोहचत असेल तर तुम्हाला…”; सेलिब्रिटींना लगावला टोला

फक्त अजय देवगण नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांनी कोणाचेही नाव न घेता ट्वीट केले आहे. अभिनेता अक्षय कुमार ट्विट करत म्हणाला, “शेतकरी हा देशाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जात आहे. मतभेद निर्माण करणाऱ्या प्रत्येकाकडे लक्ष देण्यापेक्षा #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda” अशा आशयाचे ट्वीट अक्षयने केले आहे.