सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन गटातील लोकांमध्ये मारहाण होत असल्याचे दिसत आहे. पण मारहाण करत असलेली व्यक्ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अजय देवगण असल्याचा दावा केला जात होता. आता अजयच्या टीमने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले आहे.

अजयच्या टीमने पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी ‘जानेवारी २०२०मध्ये तान्हाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटाच्या पोस्ट प्रमोशनसाठी अजय देवगण दिल्लीला गेला नव्हता. त्यामुळे दिल्लीमधील एका पब बाहेर झालेल्या भांडणामध्ये अजय देवगण सहभागी होता हे वृत्त चुकीचे आणि निराधार आहे. ज्यांना या व्हिडीओमध्ये अजय देवगण आहे असे वाटत आहे त्यांना आम्ही सांगू इच्छितो की अजय गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मैदान, मायडे आणि गंगुबाई काठियावाडी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. गेल्या १४ महिन्यांपासून अजय दिल्लीला गेलेला नाही. कोणत्याही अफवा पसवरण्यापूर्वी पहिले सत्य जाणून घ्या’ असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ दिल्लीमधील एका पब बाहेरील असल्याचे म्हटले जात होते. तसेच या व्हिडीओमध्ये दोन गटांमध्ये मारहाण होत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा माणूस हा अजय देवगण असल्याचा दावा केला जात होता. या व्हिडीओमध्ये अजय देवगणसारखा दिसणारा व्यक्ती नशेत होता आणि कार पार्किंगवरून सुरू झालेले हे भांडण पुढे मारहाणीपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. एका व्यक्तीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत नशेत असणारा व्यक्ती अजय देवगण आहे का? असा देखील प्रश्न विचारला आहे. पण आता ती व्यक्ती अजय देवगण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.