आजकाल सेलिब्रिटींसोबतच सोशल मीडियावर स्टारकिड्सचीही तेवढीच चर्चा असते. स्टारकिड्सचं बाहेर वावरणं, त्यांचं फॅशन याबाबत नेटकऱ्यांमध्ये मतमतांतरे सुरुच असतात. अनेकदा त्यामुळे स्टारकिड्सना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. अभिनेता अजय देवगणने नुकतंच त्याच्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमधील अजयची मुलगी न्यासाच्या कपड्यांवरून टीकाटिप्पणी होऊ लागली. कपड्यांवरून मुलगी न्यासाला ट्रोल करणाऱ्यांना अजय देवगणने सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘स्टारकिड्सचे प्रत्येक ठिकाणी फोटो काढणं बंद करा अशी विनंती मी पापाराझींना करतो. सेलिब्रिटींची मुलं असल्याचा फटका त्यांनी का भोगावा? कधीकधी ते इतके लहान असतात की फोटोग्राफर्ससमोर कसं वागावं हे त्यांना नाही समजत. त्यांना मुक्त वावरण्याचं स्वातंत्र्य द्या,’ असं तो म्हणाला.

न्यासाला ट्रोल करण्याबाबत तो पुढे म्हणाला, ‘न्यासा फक्त १४ वर्षांची आहे. बऱ्याचदा लोक हे विसरतात आणि वाटेल ते बोलतात. तिने लांब शर्ट आणि शॉर्ट पँट परिधान केली होती. लोकांना सत्य माहित नव्हतं आणि त्यांनी उगाच ट्रोल करण्यास सुरुवात केली.’