अभिनेता अजय देवगणने धारावीसाठी मोठी मदत केली आहे. मुंबई महानगरपालिका धारावीमध्ये २०० बेड्सची सुविधा असलेलं कोविड-१९ रुग्णालय सुरू करणार आहे. १५ दिवसांत हे रुग्णालय बांधण्यात आलं आहे. या रुग्णालयात लागणारे ऑक्सिजन सिलिंडर आणि पोर्टेबल व्हेंटिलेटर्स यांची सुविधा अजयने केली आहे. अजय देवगण फिल्म्स फाऊंडेशनकडून (ADFF) ही मदत करण्यात आली आहे. याआधी फाऊंडेशनकडून धारावीतील ७०० कुटुंबीयांना अन्यधान्य पुरवण्यात आलं होतं.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र नेचर पार्कच्या पार्किंगसाठी आरक्षित ठेवलेल्या एमएमआरडीएच्या ४००० चौरस फुटांच्या जागेवर हे रुग्णालय बांधण्यात आलं आहे. कोविड-१९ रुग्णांवर याठिकाणी उपचार करण्यात येतील. रुग्णालयाच्या बांधणीचं काम सुरु असताना अजय देवगणने प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत केली.

आणखी वाचा : लॉकडाउनमध्ये पतीसोबत अजून राहू नाही शकत म्हणणाऱ्या महिलेला सोनू सूदचं भन्नाट उत्तर 

“२०० बेड्ससाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि दोन पोर्टेबल व्हेंटिलेटर्सची गरज भासेल असं आम्ही त्याला सांगितलं होतं. त्यानुसार त्याने या गोष्टींचा खर्च उचलला”, अशी माहिती जी-नॉर्थ वॉर्डचे सहाय्यक मनपा आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. या रुग्णालयात ४ डॉक्टर्स, १२ नर्सेस आणि २० वॉर्डबॉय वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतील.