शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये काही मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. तानाजी मालुसरे हे त्यापैकीच एक नाव आहे. तानाजींच्या पराक्रमाच्या कथा अभिनेता अजय देवगण चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याच्या शूटिंगमध्ये अजय व्यग्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाचं ‘तानाजी’ हे नाव बदलून ‘तान्हाजी’ असं ठेवण्यात येणार असल्याचं कळतंय.

आजवर विविध कारणांमुळे बऱ्याच चित्रपटांची नावं बदलण्यात आली. पण अजयच्या या चित्रपटाचं शीर्षक बदलण्यामागे ज्योतीषीचे कारण सांगितलं जात आहे. अद्याप अजयने याबाबत कोणतीही माहिती दिली नसून चित्रपट पटकथालेखनाच्या टीमने या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

या चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली. अजय यामध्ये तानाजींची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर सलमान खान शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. १५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजयने ‘तानाजी’चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर शूटिंगलाही सुरुवात झाली. मराठी अभिनेता अजिंक्य देव या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ही कोणती भूमिका असणार याबाबत अद्याप काही स्पष्ट झालं नाही.

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराज आणि त्यांच्या निर्भीड मावळ्यांच्या पराक्रमांच्या गाथा जिवंत केल्या जाणार आहेत. सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढण्यासाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चित्रपटाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत.