12 November 2019

News Flash

…म्हणून अजयने बदलली ‘तानाजी’ चित्रपटाच्या नावाची स्पेलिंग

चित्रपटाच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये झालेला बदल चर्चेचा विषय ठरला.

'तानाजी: द अनसंग वॉरियर'

बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपटांची संख्या वाढत असून प्रेक्षकांचाही या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. असाच एक चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला. बहुचर्चित ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील अजय देवगण व सैफ अली खान यांच्या भूमिकांवरून पडदा उचलण्यात आला. मात्र त्याच वेळी चित्रपटाच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये झालेला बदल चर्चेचा विषय ठरला. तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाच्या नावाची स्पेलिंग अजयने ‘Tanhaji’ अशी ठेवली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योतीष व अंकशास्त्रज्ञ भाविक संघवी यांच्या म्हणण्यानुसार निर्मात्यांनी चित्रपटाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. ” चित्रपटाच्या शीर्षकासाठी निर्माते माझ्याकडे आले होते. हा चित्रपट नवीन वर्षात प्रदर्शित होणार असल्याने मी त्यांना स्पेलिंग बदलण्याचा सल्ला दिला होता. संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या शीर्षकासाठीसुद्धा माझा सल्ला घेण्यात आला होता”, असं संघवी म्हणाले.

आणखी वाचा: तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’

‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणास्तव प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. या चित्रपटाच्या निमित्ताने काजोल व अजय तसंच अजय व सैफ अली खान बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. अजय तानाजींच्या तर सैफ उदयभान राठोडच्या भूमिकेत आहे. तर काजोल ही तानाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

First Published on October 21, 2019 5:52 pm

Web Title: ajay devgn taanaji the unsung warrior will now be called tanhaji due to this reasons ssv 92