महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करणं हे कोणत्याही स्तरातील कलाकारासाठी स्वप्न असतं. सध्या तर त्यांच्याबरोबर भूमिकांचे वेगवेगळे प्रयोग करून पाहण्यात अनेकांना रस आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिवाय’ चित्रपटानंतर दिग्दर्शनाचं शिवधनुष्य अभिनेता अजय देवगणने काही काळ बाजूला ठेवलं होतं. आता दिग्दर्शक म्हणून त्याच्या तिसऱ्या चित्रपटाची तयारी त्याने सुरू केली आहे आणि याच चित्रपटात तो पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शित करणार आहे.

अजयने याआधी ‘मेजरसाब’, ‘खाकी’ आणि प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटांतून अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एकत्रित काम केलं आहे. मात्र दिग्दर्शक म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव असणार आहे. ‘मेडे’ असे या आगामी चित्रपटाचे शीर्षक असून अजय स्वत: या चित्रपटात वैमानिकाची भूमिका साकारणार आहे. या आगामी थरारपट अमिताभ यांची भूमिका काय असणार, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. सध्या तरी चित्रपटासाठी इतर कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. अमिताभ बच्चन सध्या ‘केबीसी’च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. त्यांचे हे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर अजयच्या चित्रपटाची सुरुवात होईल, असे सांगितले जाते.

खुद्द अजयही सध्या ‘भुज – द प्राईड’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे उरलेले काम संपवण्याच्या मागे आहे. ‘डिस्ने हॉटस्टार’वर ‘भुज – द प्राईड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी अद्याप त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. हा चित्रपट संपवून डिसेंबरमध्ये हैदराबादमध्ये ‘मेडे’चे चित्रीकरण सुरू होईल, अशी चर्चा आहे. या चित्रपटाची निर्मितीही अजय देवगण फिल्म्सकडूनच केली जाणार आहे. आणखी काही महत्त्वाच्या चित्रपटांचा निर्माता म्हणून अजय प्रेक्षकांसमोर येणार आहे.