आजवरच्या कारकिर्दीमध्ये सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता अजय देवगण जाहिरातींच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरही झळकला आहे. अजयने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं असून सध्या त्याच्या एका जाहिरातीमुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. अजय गेल्या कित्येक काळापासून तंबाखू उत्पादनाच्या जाहिराती करत आहे. मात्र तंबाखूचा प्रचार होईल अशा जाहिराती करु नका, अशी विनंती त्याच्या एका कर्करोगग्रस्त चाहत्यांनी केली आहे.

राजस्थानमध्ये राहणाऱ्या नानकराम या कर्करोगग्रस्त व्यक्तीने “समाजाच्या कल्याणासाठी तंबाखू उत्पादनाची जाहिरात करु नका”, असं आवाहन अजयला केलं आहे. त्यासोबतच अजय देवगणला संबोधित करत जयपूरच्या सांगानेर, जगतपुरा आणि इतर जवळपासच्या परिसरामध्ये एक हजार पत्रक वाटले आणि भितींवर लावले आहेत. यामध्ये तंबाखूचं सेवन केल्याने त्याचे परिणाम आणि त्याच्यामुळे कुटुंबावर ओढावलेली स्थिती याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

जयपूरमध्ये वितरित करण्यात आलेल्या पत्रकात त्याने मद्य, सिगारेट आणि तंबाखू-गुटखा यांसारख्या अंमली पदार्थांच्या जाहिराती करणे चुकीचे आहे, असं सांगितलं आहे. या प्रकारच्या समाजाला घातक असलेल्या पदार्थांच्या जाहिराती करु नये असे आवाहन या पत्रकाद्वारे केलं आहे.

नानकराम अजयचा खूप मोठा चाहता असून अजय तंबाखू उत्पादनाची जाहिरात करतो हे पाहून नानकरामनेही या उत्पादनांचे सेवन सुरु केले. परिणामी, त्याला कर्करोग झाल्याचं त्याच्या घरातल्यांनी सांगितलं.

“माझे वडील नानकराम मीणा हे अजय देवगणचे खूप मोठे चाहते आहेत. त्यामुळे अजयचा प्रत्येक चित्रपट, जाहिरात ते आवडीने पाहत असे. अजय देवगण गेल्या कित्येक काळापासून तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती करत आहेत. हे पाहून माझ्या वडीलांनीही तंबाखू उच्पादनांचं सेवन करण्यास सुरुवात केली. मात्र काही काळातच त्यांना कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यामुळे इतक्या मोठ्या कलाकाराने अशाप्रकारच्या जाहिराती करु नये,अशी विनंती आता माझे वडील करत आहेत”, असं नानकराम यांचा मुलगा दिनेश मीणा याने सांगितलं.

नानकराम यांना दोन मुलं आहेत. कर्करोग होण्यापूर्वी त्यांचं चहाचं दुकान होतं. मात्र आता कर्करोग झाल्यामुळे त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे त्यांना सांगानेर परिसरात दुध विक्री करुन आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह चालवावा लागत आहे.