लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित ‘रिंगण’ चित्रपटाद्वारे अजय गोगावले पुन्हा एकदा पंढरपूरच्या विठोबाला साद घालण्यासाठी व समस्त श्रोत्यांना आपल्या तालावर नाचविण्यासाठी ‘देव पाहिला’ म्हणत सज्ज झालेला आहे.

पांडुरंग आणि पंढरपूर म्हंटलं की अजयचं ‘माऊली माऊली रूप तुझे’ हे गाणं डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. या गाण्याने फक्त पंढरपूरच नव्हे तर अखंड महाराष्ट्र भारावून गेला होता.  आजवर ‘खेळ मांडला’ असो किंवा ‘डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजे ला’ असो कोणत्याही प्रकारचं गाणं असू देत त्याच्या प्रत्येक गाण्याने रसिकांच्या मनावर राज्य करणारा ‘सैराट’मय अजय रिंगणात अडचणीत सापडलेल्या एका बाप लेकाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविण्यासाठी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला आपल्या सुरेल गाण्याने साद घालतं आव्हान करत आहे.

वाचा : ..’त्या’ रिक्षावाल्याला सलमानने दिलं इतकं भाडं?

काही दिवसांपूर्वीच रिंगण चित्रटपाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये आईच्या शोधात असणारा, एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला दिसतो.  बाप आणि मुलातील एक वेगळाच संघर्ष यात पाहायला मिळतो. त्या लहानग्या मुलाची आईविषयी असणारी निरागस स्वप्नं आणि ही सगळी परिस्थिती सांभाळण्याचा बापाचा अट्टाहास हा सगळा प्रवास ‘रिंगण’ च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. दरम्यान, ‘पिचर्स’मधला ‘मंडल’ म्हणजेच अभय महाजन या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

वाचा : दहावीच्या निकालानंतर रिंकू या क्षेत्राची करणार निवड?

विधि कासलीवाल प्रस्तुत ‘रिंगण’ या चित्रपटाची गाणी रोहीत नागभीडे यांनी संगीतबद्ध केलेली असून वैभव देशमुख याने ती लिहिलेली आहेत. चित्रपटाची  कथा आणि दिग्दर्शन मकरंद माने यांचे असून छायाचित्र दिग्दर्शन अभिजित अब्दे यांनी केले आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित ‘रिंगण’ हा चित्रपट येत्या ३० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.