बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला मंगळवारी ३० मार्च रोजी ड्रग्ज प्रकरणात अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) विमानतळावरून ताब्यात घेतलं. त्यानंतर जवळपास आठ तास त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर एनसीबीने त्याला अटक केली. एनसीबीकडून एजाजशी संबंधित अंधेरीमधील लोखंडवाला येथील अनेक ठिकाणांवर धाडी देखील टाकण्यात आल्या. दरम्यान अटकेनंतर एजाजने त्याच्या घरात सापडलेल्या झोपेच्या गोळ्यांवर खुलासा केला आहे.

‘माझ्या घरात केवळ चार झोपेच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. माझ्या पत्नीचा गर्भपात झाला आणि ती झोपेसाठी या गोळ्या घेत होती’ असं एजाज खानने म्हटलं आहे.

मंगळवारी राजस्थानहून मुंबई विमानतळावर उतरताच एजाज याला एनसीबी पथकाने ताब्यात घेतलं. त्याची एनसीबीच्या विभागीय कार्यालयात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. यानंतर त्याला अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात एनसीबीने शादाब शेख उर्फ शादाब बटाटा या अंमलीपदार्थ विक्रेत्याला अटक केली होती. चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींना मागणीप्रमाणे विविध अंमलीपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी शादाब प्रसिद्ध होता. त्याच्या चौकशीतून अभिनेता एजाजचे नाव पुढे आले होते.

अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही

ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानचं नाव येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१८ मध्ये बिग बॉसचा स्पर्धक राहिलेल्या एजाज खानना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबईतील एका हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले होते.