करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिल रोजी रात्री ९ वाजता देशातील १३० कोटी भारतीयांना घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले. यावरुन अभिनेता एजाज खान याने मोदींना उपरोधिक टोला लगावला आहे.

काय म्हणाला एजाज खान?

“सर्व दिवे विझवल्यामुळे करोनाला वाटेल आता भारतात कोणीच नाही. त्यामुळे तो भारत सोडून निघून जाईल. धन्यवाद मोदी जी.” अशा आशयाचे ट्विट करुन अभिनेता एजाज खानने नरेंद्र मोदींवर उपरोधिक टोला लगावला आहे.

एजाज खान एक टीव्ही अभिनेता आहे. त्याने या पूर्वी ‘अदालत’, ‘भाभी’, ‘केसर’, ‘कुसुम’, ‘क्या होगा निम्मो का?’ यांसारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. मात्र गेल्या काही काळात तो आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत राहू लागला आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एजाजने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

“करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत,” असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व दिवे, लाइट्स बंद करुन घरातील बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा, असं आवाहन मोदींनी केलं. “करोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या गरीब जनतेला सकारात्कमतेकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यालाच त्यांना सोबत घेऊन जायचं आहे, ” असं भावनिक आवाहन मोदींनी देशातील जनतेला केलं. आपण सर्वांनी एकत्र येऊन या करोनाच्या अंध:काराला पळवून लावूयात असं सांगत मोदींनी आपलं भाषण संपवलं.