करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या प्राणघातक विषाणूशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार ‘पंतप्रधान मदत निधी’साठी दान करत आहेत. दरम्यान अभिनेता एजाज खानने वरुन धवनने केलेल्या मदतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. श्रीमंत असुनही वरुनने केवळ २५ लाख रुपये दिले, हे एजाजला पटलेले नाही.

काय म्हणाला एजाज खान?

“वरुण हे पैसे फारच कमी आहेत. या क्षणी तू आमचा सुपरस्टार आहेस. समज एका चित्रपटात तू काम केलच नाहीस. त्या चित्रपटाचे पैसे तू लोकांच्या मदतीसाठी दे.” अशा आशयाचे ट्विट एजाज खानने केले आहे.

एजाज खान एक टीव्ही अभिनेता आहे. त्याने या पूर्वी ‘अदालत’, ‘भाभी’, ‘केसर’, ‘कुसुम’, ‘क्या होगा निम्मो का?’ यांसारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. मात्र गेल्या काही काळात तो आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत राहू लागला आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एजाजने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.