News Flash

अजब प्रेमाच्या गजब गोष्टी

शेफाली शहा आणि मानव कौल या दोन ताकदीच्या कलाकारांना एक नव्या अवतारात पाहणं हा सुखद अनुभव ठरला आहे.

रेश्मा राईकवार

एकाच विषयावरचे चार वेगवेगळे दृष्टिकोन, त्यांनी त्यांच्या नजरेतून पाहिलेलं जग – त्यांना दिसलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यांनी त्यांच्या जाणिवनेणिवेतून रंगवलेलं त्या व्यक्तिरेखांचं भावविश्व याची एकत्रित अनुभूती घेणं ही कित्येकदा पर्वणी असते. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘अजीब दास्तान्स’ या चार लघुकथांना एकत्रित बांधणाऱ्या चित्रपटाकडेही त्याच दृष्टीने पाहायला हवं. याआधी आपण हे प्रयोग करण जोहर, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी, अनुराग कश्यप यांच्याबाबतीत अनुभवले आहे. ‘अजीब दास्तान्स’ हा दिग्दर्शनाच्या पातळीवरही वेगळा अनुभव ठरावा, कारण नेहमीच्या चर्चेतील दिग्दर्शकांपेक्षा इथली नावे वेगळी आहेत. यातलं शशांक खेतान हे नाव त्यातल्या त्यात धर्मा प्रॉडक्शनच्या सराईत चौकटीत वावरलेलं नाव सोडलं तर बाकीची तिन्ही नावं वेगळी आहेत.

‘अजीब दास्तान्स’मधील चारही कथांमध्ये म्हटलं तर एकच एक कथेचा धागा आहे आणि म्हटलं तर या एकमेकांशी कु ठेच जोडल्या जात नाहीत. प्रेम, प्रेमातून येणाऱ्या अपेक्षा आणि होणारी फसवणूक हा त्यातल्या त्यात समान धागा आहे असे म्हणता येईल. याचे कारण मूळ संकल्पना प्रेमाची असली तरी यातली नीरज घेवान दिग्दर्शित ‘गीली पूछी’ ही या चारही कथांमध्ये फार वेगळी ठरली आहे. प्रेमाच्या संकल्पनाही आपल्याकडे ठरावीक विचारचौकटींवर बेतलेल्या आहेत. अनेकदा आपल्या प्रेमाच्या संकल्पना किंवा विचार हे बॉलीवूडी प्रेमपटांवरून प्रभावित असतात. मग यात समलिंगी प्रेमाची कथा असेल तरीही आकं ठ प्रेमात बुडालेल्या दोन व्यक्ती त्या चौकटीपलीकडे जाताना दिसत नाहीत. मुळात प्रेमात पडलेले दोन जीव समलिंगी असोत वा भिन्नलिंगी.. त्यांना त्यांची जात-धर्म, मूळ स्वभाव आणि त्यातल्या नवरसांचा उद्रेक, जडणघडणीतून तयार झालेली मतं या सगळ्या गोष्टी चिकटलेल्या असतात. कितीही आदर्श विचार करणारा माणूसप्राणी वास्तव आयुष्यात या सगळ्याच्या अधीन राहूनच व्यक्त होत असतो. ‘गीली पूछी’मध्ये ही बाब दिग्दर्शकाने ठळकपणे मांडली आहे. कंपनीत कामगार म्हणून पुरुषांबरोबर काम करणाऱ्या भारतीला तिथे डेटा ऑपरेटरची नोकरी हवी आहे. त्यासाठी लागणारी सगळी गुणवत्ता तिच्याकडे आहे, मात्र तिची जात आडवी येते. रोखठोक वागणाऱ्या भारतीची दुसरी दुखरी बाजू आहे ती प्रेमाची. समलैंगिक असलेल्या भारतीने आपल्या वास्तव आयुष्याचा पूर्ण स्वीकार के ला आहे. त्याउलट, चांगल्या घरातून आलेली, ब्राह्मण असलेल्या प्रिया शर्माला डेटा ऑपरेटरची जागा मिळाली आहे. तिला भारतीविषयी आकर्षण वाटतं आहे. आपल्या मनातील गोंधळाची प्रियाला जाणीव आहे, पण प्रत्यक्षात तिने या सत्याचा स्वीकार के लेला नाही. प्रियाच्या येण्याने भारतीच्या मनात पुन्हा एकदा प्रेमाची आशा पालवते. एका निसटत्या क्षणाला मात्र आपली जात प्रियाच्या मनातही सलते आहे याची जाणीव तिला होते आणि प्रियाच्या वागण्याला काही न बोलता सडेतोड उत्तर ती देते. नीरज घेवान दिग्दर्शित ‘गीली पूछी’ ही कथा जास्त वेगळी ठरते कारण त्यातल्या व्यक्तिरेखा आदर्श कल्पनांवर जगत नाहीत, त्या आपल्या मूळ भावभावनांवर खऱ्या उतरतात. कोंकणा सेन शर्मा आणि अदिती राव हैदरी या दोन अभिनेत्रींची कमाल यात पाहायला मिळते. अर्थात, अदितीच्या सौंदर्याचा वेगळ्याच प्रकारे वापर दिग्दर्शकाने करून घेतला आहे.

कायोझ इराणी दिग्दर्शित ‘अनकही’ ही शीर्षकापासूनच विषयाशी प्रामाणिक आहे. रूढार्थाने या प्रेमकथेत कोणाचीही फसवणूक नाही, पण आयुष्यात अनेकदा आपलीच फसगत होते. पती – पत्नीच्या नात्यात पडत जाणारं अंतर हे खूप वेगवेगळ्या कारणांनी असू शकतं, पण हा अंतराय वाढण्याचा प्रकार सर्रास घराघरांतून होताना दिसतो. नताशा, रोहन आणि त्यांची मुलगी समायराची ही गोष्ट आहे. समायराला ऐकू  येत नाही, तिच्यासाठी संवाद साधण्यासाठी खुणांची भाषा शिकू न घेणं हाच पर्याय आहे हे नताशा रोहनला सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र ती भाषा शिकायला आपल्याला वेळ नाही, असं सतत रोहन तिला ऐकवत राहतो. एका क्षणाला आपल्या दोघांमध्ये हेच एक वादाचं कारण नाही, तर मुळात रोहनच्या मनात आपल्यासाठी प्रेमच नाही आहे, याची जाणीव झालेल्या नताशाच्या आयुष्यात कबीरचा प्रवेश होतो. कबीरही कर्णबधिर आहे, पण नताशा आणि त्याच्यामध्ये संवादाचा एक सहजधागा तयार होतो. त्यांच्यात अलवार प्रेम उमलू लागतं, मात्र हे नातं पुढे जाणार की नाही याचा विचारही न के लेल्या नताशाला वास्तवाची नव्याने जाणीव होते. शेफाली शहा आणि मानव कौल या दोन ताकदीच्या कलाकारांना एक नव्या अवतारात पाहणं हा सुखद अनुभव ठरला आहे.

त्या तुलनेत राज मेहता दिग्दर्शित ‘खिलौना’ आणि शशांक खेतान दिग्दर्शित ‘मजनू’ या दोन कथा नव्या संदर्भासहित आल्या असल्या तरी त्यातला आशय अजिबातच नवीन राहिलेला नाही. ‘खिलौना’ अंगावर येते खरी.. मात्र यात कथेच्या अनुषंगाने झोपडीत राहून श्रीमंतांच्या घरात काम करणाऱ्यांच्या मानसिकतेवर, त्यांच्या स्वप्नांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकण्यात आला आहे. सामाजिक समता आणि न्याय या कितीही आदर्शवत कल्पना असल्या तरी आत्ताच्या आधुनिक युगात झोपडय़ांमध्ये राहणाऱ्यांची आणि बंगल्यांमध्ये राहणाऱ्यांची दोन पूर्णपणे वेगळी विश्व आहेत आणि ती कधीतरी आपल्या सोईनेच एकत्र येऊ शकतात हे दिग्दर्शक थेट मांडतो. अजूनही उत्तर प्ररदेशमधील कु ठल्यातरी गावखेडय़ात सुरू असलेलं राजकारण, कोणीतरी बबलू भैय्या आणि त्याचा सरंजाम, नोकरांवर होणारा अत्याचार या सगळ्या गोष्टी ‘मजनू’मध्ये पाहायला मिळतात. अर्थात, परदेशात मोठी नोकरीची संधी आलेला उच्चशिक्षित असा राज या साम्राज्याला प्रेमाचेच शस्त्र वापरून हलवून सोडतो. या गोष्टीत समलिंगी प्रेमाचा के लेला वापर, प्रेमातून पत्करावा लागलेला धोका या सगळ्या गोष्टी त्याच मसाल्यासह येतात. एकाच विषयाचे संदर्भ अनेक.. त्यामुळे प्रत्येक वेळी नव्या चष्म्यातून नवी गजब गोष्ट पाहण्याचा अनुभव या अजब दास्तानींमधून मिळाल्याशिवाय राहणार नाही.

अजीब दास्तान्स

दिग्दर्शक – शशांक खेतान, राज मेहता, नीरज घेवान आणि कायोझ इराणी

कलाकार – जयदीप अहलावत, फातिमा सना शेख, नुसरत भरूचा, अभिषेक बॅनर्जी, कोंकणा सेन शर्मा, अदिती राव हैदरी, शेफाली शहा, तोता रॉय चौधरी आणि मानव कौल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 3:00 am

Web Title: ajeeb daastaans movie review zws 70
Next Stories
1 “..म्हणून मी बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही”; या अभिनेत्रीने केला खुलासा
2 प्रियांका चोप्रा लाँच करणार कबीर बेदींचे आत्मचरित्र
3 मनोरंजनाचा डबल धमाका, अजय देवगणचा ‘तान्हाजी’ आता मराठीत पाहण्याची संधी!
Just Now!
X