छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम आजवर बऱ्याच साहित्यातून आणि चित्रपटांमधून आपण ऐकला आणि पाहिला आहे. याच सुवर्णमय इतिहासाची दखल आता बॉलिवूडनेही घेतल्याचं पाहायला मिळते. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता अजय देवगण लवकरच तानाजी मालुसरे यांच्यावर साकारल्या जाणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली. यामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याचीही वर्णी लागली आहे.

काही दिवसांपूर्वीच अजयने ‘तानाजी’चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर शूटिंगलाही सुरुवात झाली. अभिनेता अजिंक्य देव या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ही कोणती भूमिका असणार याबाबत अद्याप काही स्पष्ट झालं नसून अजिंक्य सध्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या शूटिंगबाबत अजिंक्यने ट्विटसुद्धा केलं होतं. चित्रपटाच्या काही नियमांमुळे इतक्यात भूमिकेबद्दल मी काही सांगू शकत नाही पण ही अत्यंत महत्त्वाची भूमिका असून त्याची शूटिंग सध्या सुरू आहे, असं अजिंक्यने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना म्हटलं.

वाचा : जाणून घ्या, ‘तुला पाहते रे’ मालिकेतील गायत्री दातारविषयी 

‘तानाजी’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अभिनेता सैफ अली खानला विचारण्यात आलं आहे. दरम्यान, १५० कोटी रुपयांचx बजेट असलेल्या या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराज आणि त्यांच्या निर्भीड मावळ्यांच्या पराक्रमांच्या गाथा जिवंत केल्या जाणार आहेत. सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढण्यासाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चित्रपटाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत. तेव्हा आता ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजींची गाथा अनुभवण्यासाठी उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.