रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि श्लोका मेहता यांचा विवाहसोहळा ९ मार्च रोजी मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाला क्रिडापटू, आंतरराष्ट्रीय नेते आणि बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या साऱ्यांनी आकाशच्या वरातीत सहभाग घेत गाण्यावर ठेकाही धरला. आकाशच्या याच वरातीतला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून आकाशने या वरातीत अभिनेता शाहरुख खानचा अपमान केल्याचं दिसून येत आहे. इतकचं नाही तर नेटकऱ्यांनीही शाहरुखला ट्रोल केलं आहे.

आकाशच्या वरातीमध्ये बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार डान्स करत होते. यामध्ये शाहरुख खान आणि रणबीर कपूरदेखील होते. मात्र डान्स करत असताना आकाशने मध्येच शाहरुखला बाजूला सरकण्यास सांगितलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

वरातीमध्ये आकाश आल्यानंतर रणबीर बाजूला सरकला होता. मात्र शाहरुख तेथेच नाचत होता. मात्र आकाशने शाहरुखला बाजुला सारत निता आंबानी यांना नाचण्यासाठी पुढे खेचल्याचं पाहायला मिळालं. या प्रकारानंतर शाहरुख मागे उभा राहिला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी शाहरुखलाच ट्रोल केलं असून आकाशने शाहरुखला खरी जागा दाखवून दिल्याचं म्हटलं आहे.

शाहरुख आणि आंबानी कुटुंबाचे चांगले घरोब्याचे संबंध असल्यामुळे आकाशने हक्काने शाहरुखला बाजूला सारलं असेल. मात्र शाहरुखच्या चाहत्यांना ही गोष्ट खटकली आहे. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी शाहरुखप्रती सहानभुती दर्शविली तर काहींनी टीका केला.

आकाशने जे काही केलं त्यामुळे शाहरुखला कुठे तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नाही, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर कलाकाराची काही किंमत उरली नाही असंही एका युजरने म्हटलं आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या मुद्द्यावरुन बरीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, आकाश अंबानी प्रसिद्ध हिरेव्यापारी रसेल मेहता यांची धाकटी मुलगी श्लोका मेहताशी लग्न केलं आहे. श्लोका हिने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रिंस्टन युनिव्हर्सिटीतून अँथ्रोपोलॉजीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटीकल सायन्सची निवड केली. २०१४ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्लोकाने ‘रोसी ब्ल्यू फाऊंडेशन’मध्ये संचालक म्हणून पदभार सांभाळला. इतंकच नाही, तर श्लोका ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची सहसंस्थापिकाही आहे. ही संस्था विविध एनजीओंना मदत करते.