ऐतिहासिक कथानकावर आधारित असलेल्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचा विरोध आता आणखी तीव्र झाला आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या मुंबईतील जुहू इथल्या घराबाहेर राजपूत संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला संघटनेचा विरोध आहे.

घटनास्थळी परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलं. ‘अखंड राजपुताना सेवा संघ’च्या १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. इतिहासाची मोडतोड करून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आणि यामध्ये राणी पद्मिनीची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

‘पद्मावती’ या चित्रपटात राणी पद्मिनी आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यात कोणतेही आक्षेपार्ह दृष्य नसल्याचं भन्साळी यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं. कोणच्याही भावना दुखावतील असे एकही दृष्य यामध्ये नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र तरीही हा विरोध कमी होताना दिसत नाही. १ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण राणी पद्मिनीची, शाहिद कपूर महारावल रतन सिंहची तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे.