साहित्य संमेलन म्हटलं की संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीतलं राजकारण, वादंगाचा धुरळा, आरोप-प्रत्यारोप, आयोजकांची दादागिरी, संमेलन व्यासपीठावरील राजकीय नेत्यांची गर्दी वगैरे गोष्टी आता सर्वजण गृहीतच धरतात. परंतु गेल्या आठवडय़ात नाटय़कर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून आकारलेलं ‘असेही एक साहित्य संमेलन’ हे मात्र अशा कुठल्याही वादंगाशिवाय निर्विघ्नपणे पार पडलं. तेही ‘एक’मतानं! अर्थात हे ‘एक’मत होतं अशोक मुळ्ये यांचं! ‘लोककल्याणकारी एकाधिकारशाही’ ही संकल्पना कितीही आकर्षक वाटत असली तरी तिचे म्हणून काही गुणदोष असतातच. हे संमेलनही त्यास अपवाद नव्हतं. संमेलनात सहभागी झालेल्या सर्वानीच अशोक मुळ्ये यांची ही एकाधिकारशाही मान्य केली होती. अर्थात त्यांच्या मनस्वीपणाला दिलेली ती दाद होती, तशीच मुळ्येंची प्रेमळ दहशतही त्यामागे होती. अभिनेत्री अमृता सुभाष यांनी याचं समर्पक वर्णन संमेलनात बोलताना केलं.. ‘अशोक मुळ्येंची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आपणा सर्वापेक्षा वेगळी आहे. ज्या गोष्टी बऱ्याचदा आपल्या दृष्टीतून कळत-नकळत निसटलेल्या असतात अशा गोष्टी ते अचूकपणे हेरतात. आणि मग त्या गोष्टी प्रकाशझोतात आणण्यासाठी ते अक्षरश: जिवाचं रान करतात. समाजातील चांगल्या, सकारात्मक, परंतु लोकांकडून दुर्लक्षिल्या गेलेल्या गोष्टींचं भरभरून कौतुक करताना माणुसकीचं एक आगळंवेगळं दर्शन मुळ्ये यांच्या विविध उपक्रमांतून घडतं. या उपक्रमांत कोणत्याही लाभाचा विचार नसतो. माणूस म्हणून मला हे खूप मोलाचं वाटतं. आणि मुळ्ये यांच्या या गुणामुळेच त्यांच्याकडे माणसं आकर्षित होतात.’

अशोक मुळ्ये यांना अशाच उद्योगांतून ‘असेही एक साहित्य संमेलन’ भरविण्याची कल्पना सुचली. दिवाळी अंकांतून लिहिणाऱ्या नवोदित, होतकरू लेखकांना व्यासपीठावर आणून त्यांचा सन्मान करावा, ही या संमेलनामागची त्यांची भूमिका. त्याकरता त्यांनी संमेलनाध्यक्षपदी निवड केली ती गेली २५ वर्षे ‘ऋतुरंग’ हा वैशिष्टय़पूर्ण दिवाळी अंक काढणारे कवी व संपादक अरुण शेवते यांची. याच विचारातून त्यांनी साहित्य क्षेत्रात जागल्याच्या भूमिकेत वावरणाऱ्या रविप्रकाश कुलकर्णी यांची स्वागताध्यक्षपदी निवड केली. यावर्षीच्या त्यांच्या ‘माझा पुरस्कारां’चं वितरणही त्यांनी संमेलनाच्या या थीमला धरूनच केलं. झी मराठीने काढलेल्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाच्या विक्रमी खपाबद्दल झीच्या टीमला याप्रसंगी ‘माझा पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. तर अरुण शेवते यांना गेली २५ वर्षे ‘ऋतुरंग’ या आगळ्या दिवाळी अंकाचं संपादन केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. एकीकडे कर्करोगाशी झुंज देत असताना कथालेखन करणाऱ्या सृष्टी कुलकर्णी या तरुण लेखिकेसही ‘माझा पुरस्कारा’ने यावेळी सन्मानित करण्यात आलं.

संमेलन म्हटलं की भाषणबाजी आली. परंतु या संमेलनाचा विशेष हा, की यात संमेलनाध्यक्षांसह कुणीच कंटाळवाणी भाषणं केली नाहीत. स्वागताध्यक्ष रविप्रकाश कुलकर्णी यांनी या संमेलनामागील भूमिका विशद केली. ‘दिवाळी अंक काढणं हे दिवसेंदिवस अत्यंत जिकिरीचं होत चाललं आहे. अशावेळी त्यात लेखन करणाऱ्या लेखकांवर आणि दिवाळी अंकांचं संपादन करणाऱ्यांवर एक वेगळी जबाबदारी येऊन पडली आहे. दिवाळी अंकांमधलं साहित्य फार काळ टिकत नाही. कारण त्याचं आयुष्य फार तर सहा महिने वा वर्षांचं असतं. ते दस्तावेजीकरणाच्या रूपाने जपलं जात नसल्याने विस्मृतीच्या अंधारात गडप होतं. म्हणूनच त्याच्या जतनाची तरतूद करणं अतिशय गरजेचं आहे. अरुण शेवते हे आपल्या दिवाळी अंकांतील साहित्याचं पुढे पुस्तकरूपात जतन करत असल्याने ते अधिक वाचक समुदायापर्यंत पोहोचू शकतं. त्यांच्या या द्रष्टेपणाचं अनुकरण कुणीतरी पुढे येऊन केलं पाहिजे आणि दिवाळी अंकांतील साहित्य कायमस्वरूपी जतन करायला हवं,’ असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं.

संमेलनाध्यक्ष अरुण शेवते यांनी नेहमीच्या अध्यक्षीय भाषणाच्या फॉम्र्युल्याला फाटा देत अनौपचारिकपणे आपले विचार मांडले. दिवाळी अंकाच्या संपादनाचं काम करत असताना अनेक लेखकांचे आलेले अविस्मरणीय अनुभव त्यांनी कथन केले आणि त्यातून संपादक म्हणून आणि एक माणूस म्हणून आपली दृष्टी कशी विस्तारत गेली याचं विवेचन त्यांनी केलं. अरुण खोपकरांकडून दुसऱ्या व्यक्तीच्या ‘स्पेस’ची (अवकाश) जाणीव प्रत्येकानं ठेवणं कसं गरजेचं आहे हे मी शिकलो. ८५ वर्षांच्या यमुनाबाई वाईकर यांच्या मुलाखतीच्या वेळी भारावलेपणातून टेपरेकॉर्डर सुरू करण्याचं भान न राहिल्यानं झालेली फटफजिती आणि यमुनाबाईंनी आमची ही चूक मोठय़ा मनानं माफ करून पुनश्च पहिल्यापासून दिलेली मुलाखत.. अशा तऱ्हेचे कवी गुलजार, विठाबाई नारायणगावकर, सुशीलकुमार शिंदे, सुरेखा पुणेकर आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे किस्से अरुण शेवते यांनी सांगितले आणि त्यातून आपण संपादक म्हणून कसकसे घडत आणि शिकत गेलो, हे त्यांनी स्पष्ट केलं. आपण माणसांना बऱ्याचदा गृहीत धरतो. परंतु प्रत्यक्षात ती कधी कधी वेगळीच असतात. स्वत:बद्दलचे आपले समज आणि अहंकार बाजूस ठेवून आपण त्यांना भेटलो तर त्यांचा वेगळा अनुभव येतो आणि माणूस म्हणून आपल्याला तो निश्चितच समृद्ध करणारा ठरतो, असं ते म्हणाले. संमेलनाध्यक्षांचं भाषण म्हणजे आत्मकथन आणि साहित्याच्या इतिहासाचा धांडोळा या प्रचलित समजाला अरुण शेवते यांच्या आपल्या भाषणाने छेद दिला. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी आपल्या भाषणात आजच्या लेखकांची वाचकांबरोबरची नाळ तुटल्याचं सांगून, प्रस्थापित छापील माध्यमाऐवजी तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या नव्या माध्यमांचा वापर लेखकांनी आता करायला हवा. आजच्या तरुणाईची भाषा, त्यांच्या आकांक्षा आणि अपेक्षा समजून घेत त्यानुरूप लेखन करायला हवं, तरच ते नव्या वाचकांना भावेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

या संमेलनात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ‘न्यूड’ चर्चा’ हा परिसंवाद ठेवला गेला होता. त्याचं सूत्रसंचालन रविप्रकाश कुलकर्णी यांनी केलं. मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्ते दीपक पवार, अभिनेते हृषिकेश जोशी आणि शरद पोंक्षे हे त्यात सहभागी झाले होते. अशोक मुळ्ये यांना गोवा चित्रपट महोत्सवातील ‘न्यूड’ सिनेमावरील बंदीवरून हा विषय बहुधा सुचला असावा. परिसंवादाच्या शीर्षकात ‘न्यूड’ हा शब्द योजल्याने तो खमंग होईल अशीही त्यांची अपेक्षा असणार. अर्थात त्यानुसार परिसंवादातील चर्चा उत्तमच झाली. परंतु त्यात विरोधी सूर कुणीच न लावल्याने ती काहीशी एकतर्फीच झाली. दीपक पवार यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विविध पैलूंचा ऊहापोह करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला केवळ दोनच बाजू असतात असं नाही, तर त्यास अनेक बाजू असू शकतात; मात्र त्या लक्षातच घेतल्या जात नाही अशी खंत व्यक्त केली. आज परिस्थिती अशी आहे की, आपल्या विचारांचा समर्थक नाही म्हणजे तो आपला विरोधकच असणार अशी बाळबोध विभागणी केली जाऊ लागली आहे, असं सांगून ते म्हणाले, समाजमाध्यमांवर तर विशिष्ट विचारसरणीच्या टोळीवाल्यांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पार गळाच घोटला जात आहे. त्यामुळे माणसाला प्रामाणिकपणे व्यक्त होणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. परंतु अशाही परिस्थितीत आपण व्यक्त होत राहिलं पाहिजे, तरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकेल. हृषिकेश जोशी यांनी देशोदेशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काय स्थिती आहे याचा सोदाहरण परामर्श घेतला. पाश्चात्य देशांत असलेलं संपूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण आपल्या देशात कधीतरी उपभोगू शकू का, असा अंतर्मुख करणारा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडण्याच्या प्रकाराचा उल्लेख करून ते म्हणाले की, गडकऱ्यांनी नेमकं काय लिहिलं आहे हे नीट समजूनही न घेता त्यांचा पुतळा फोडण्याचं हे कृत्य केलं गेलं आणि त्याचं वर त्याचं समर्थनही केलं गेलं. ही अत्यंत गंभीर बाब आहे. शरद पोंक्षे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं आणि स्वातंत्र्यासोबत येणाऱ्या कर्तव्यांचं आणि जबाबदारीचंही भान प्रत्येकानं ठेवणं कसं निकडीचं आहे, हे विशद केलं.

संमेलनात रसिकांच्या मनोरंजनासाठी सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम सादर केला गेला. लोकप्रिय मराठी-हिंदी गाणी त्यात पेश करण्यात आली. अर्थात या गाण्यांची निवडही केली होती ती अशोक मुळ्ये यांनीच!

अशोक मुळ्ये उवाच..

दिवसभराच्या या संमेलनात आयोजक अशोक मुळ्ये यांनी अधूनमधून बोलताना आपल्या स्पष्टवक्तेपणाचा परिचय देत जोरदार बॅटिंग केली. संमेलनाच्या प्रास्ताविकात आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, ‘मी दिवसरात्र झटून संमेलनाचा भार एकटय़ाने वाहताना दिसत असलो तरी याकामी अनेकांनी मला स्वत:हून मदतीचे हात पुढे केले आहेत. त्यांच्या सहकार्याविना हे संमेलन यशस्वी करणं मला शक्यच झालं नसतं. व्हॅलिएबल ग्रुपचे नरेंद्र हेटे, गजानन राऊत, माझा पुरस्कारच्या ट्रॉफीज् बनवणारे विजय सोनावणे तसंच नाटय़क्षेत्रातली माझी जिवाभावाची स्नेही मंडळी यांचा यात मोलाचा वाटा आहे. ही मंडळी माझा कार्यक्रम म्हटल्यावर आपल्या घरचंच कार्य असल्याचं मानून आर्थिक मदतीसह सगळ्याच बाबतीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात. त्यांच्याशिवाय असे उपक्रम मी करूच शकलो नसतो.’ मात्र, तब्बल ११०० फोन कॉल्स करूनही सभागृह पूर्णपणे भरू शकलं नाही याबद्दलची खंतही मुळ्ये यांनी बोलून दाखवली. स्वत:ला लेखक म्हणवणारी मंडळी रोजचं वर्तमानपत्रही वाचत नाहीत असा विदारक अनुभव या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला आल्याचं त्यांनी विषादानं नमूद केलं.