काही दिवसांपूर्वी कमल हसन यांची मुलगी अक्षरा सायबर क्राइमची शिकार झाली. तिचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर लीक करण्यात आले होते. या फोटोंचा चुकीच्या पद्धीतीने वापर करण्यात आला असल्याचे अक्षराने सांगितले होते. त्यामुळे तिने मुंबई पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रारदेखील दाखल केली. पण या दरम्यान, या प्रकरणात एक नवीन स्पष्टीकरण आले आहे.

अक्षराचे ते खाजगी फोटो अक्षराने स्वतःच मला पाठवले होते, असा गौप्यस्फोट अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा मुलगा आणि अक्षराचा एक्स-बॉयफ्रेंड तनुज विरवानी याने केला आहे. मला ते फोटो अक्षरानेच २०१३ साली पाठवले होते. पण ते केवळ मी पहावे म्हणून पाठवले होते आणि मी त्या फोटोचा गैरवापर केला नाही, असे तो म्हणाला.

माझ्या ज्या फोनवर तिने ते फोटो पाठवले होते, तो फोन माझ्याकडून तुटला. तो फोन दुरुस्त करण्यासाठी खूप खर्च येणार होता, त्यामुळे तो फोन दुरुस्त करून न घेता मी नवीन फोन विकत घेतला. तिने मला ते फोटो पाठवले होते, पण आणखी कोणाला ते फोटो तिने पाठवले होते की नव्हते, याबद्दल मला माहिती नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

दरम्यान, एकीकडे आपल्या देशात #MeToo सारखी मोहीम राबवली जात आहे. तर दुसरीकडे असे लोकही आहेत जे मुलींचे खासगी फोटो केवळ आसुरी आनंदासाठी सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. दुर्दैवानं मी सायबर क्राईमची शिकार झाले आहे. माझे फोटो कोणी आणि का व्हायरल केले याची मला कल्पना नाही. पण केवळ मज्जेसाठी तरुण मुलींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, असे म्हणत अक्षराने आपली खंत व्यक्त केली होती आणि मुंबई पोलिसांकडे मदतीची विनंती केली होती.

या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घ्यावा, असेही तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.