भूषण कुमारचे वडील गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित ‘मोगल’ सिनेमाचा पोस्टर अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. अक्षय या सिनेमात गुलशन कुमार यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. अक्षय गुलशन यांना फार जवळून ओळखायचा. त्यामुळे त्याच्यासाठी आणि भूषण कुमारसाठी हा सिनेमा फार खास आहे. जरी अक्षय आणि भूषण यांनी हा सिनेमा करणार असल्याचे अनधिकृतरित्या मान्य केले असले, तरी टी-सीरीज आणि अक्षय यांच्यामध्ये कोणतीही औपचारिक बोलणी झालेली नाही. अक्षयने भूषणला इंदौरला बोलवले आणि ३०० वर्षे जुन्या शिव मंदिरात बसून अक्षयने सिनेमाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

गुलशन कुमार हे शिवभक्त होते. भूषण सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूर, अक्षय आणि सह-निर्माते विक्रम मल्होत्रासोबत एका प्राचीन शिव मंदिरात गेले आणि तिथे सिनेमाचा करार केला. डेक्कन क्रॉनिकलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, भूषणने सांगितले की, ‘माझ्या वडिलांच्या चरित्रपटाचा करार एका शिव मंदिरात करणं हा एक अदभूत अनुभव होता. त्या मंदिरात मी वडिलांचे अस्तित्व अनुभवू शकत होतो. मी जो अनुभव घेतला तो शब्दांत मांडणे माझ्यासाठी अशक्य आहे.’

अक्षयने नुकताच ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले. सध्या तो ‘पॅडमॅन’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तसंच पुढच्या वर्षी २०१८ मध्ये अक्षय ‘गोल्ड’ आणि ‘मोगल’ या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.