नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच बॉलिवूड पुरस्कारांनाही सुरुवात झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या ६२ व्या फिल्मफेअर पुरस्काराची लोकांमध्ये उत्सुकता लागून राहिली असताना या मानाच्या पुरस्कारासाठीची नामांकन  यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आणि आमिर खानच्या ‘दंगल’मधील धाकड मुलींसह ‘अलिगढ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या  मनोज वाजपेयी याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. ‘एअरलिफ्ट’ चित्रपटातील दमदार भूमिकेनंतरही अक्षय कुमारला नामांकन मिळाले नसल्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. परिणामी सोशल मीडियावर अक्षय कुमारकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होताना दिसतेय.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीमध्ये ‘दंगल’ चित्रपटातील अभिनयाबद्दल आमिर खानला नामांकन मिळाले आहे. तर महानायक अमिताभ यांची ‘पिंक’ चित्रपटासाठी या गटात वर्णी लागली आहे. ‘सुलतान’ चित्रपटासाठी सलमान खान आणि ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी शाहिद कपूर याला पसंती मिळाली असून भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूतला नामांकन देण्यात आले आहे.

या यादीमध्ये अक्षय कुमारला स्थान मिळाले नसल्यामुळे  ट्विटरवर सध्या ‘फिल्मफेअर अवार्ड’ हा हॅश टॅग ट्रेंण्ड करताना दिसत आहे. या हॅशटॅगवर अक्षय कुमारचे चाहते अक्षय कुमारचे समर्थन करताना दिसत आहे. अक्षय कुमारला नामांकन यादीमध्ये स्थान न दिल्याने अक्षयच्या चाहत्यांनी पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसते.अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ आणि ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयाबद्दल अक्षय कुमारवर कौतुकांचा वर्षाव देखील झाला होता.

दरम्यान, फिल्मफेअर २०१६ च्या नामांकनामध्ये दंगलच्या अभिनयामूळे आमिर खानला नामांकन मिळाले असले तरी या चित्रपटामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे. ‘दंगल’ चित्रपटामुळे आमिरसोबतच फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या दोघींवर कौतुकाचा वर्षाव झाला होता.  या चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत दिसला होता. तर फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी गीता फोगट आणि बबिता कुमारीच्या भूमिका साकारली होती.