रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या शेवटी रोहित शेट्टीने त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे नाव जाहीर केले. तसेच चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचेही सांगितले. अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी पहिल्यांदा एकत्र काम करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे गेल्या महिन्यात दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसह कोणती अभिनेत्री झळकणार याची चर्चा सुरू सगळीकडे होती. आता या चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस झळकणार असल्याचं समजत आहे. याआधी अभिनेत्री कतरिना कैफ आणि पुजा हेगडे या दोन नावाची चर्चा ‘सूर्यवंशी’ साठी होती.

अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस ही जोडी या आधीही ‘हाउसफुल’ चित्रपटात एकत्र पहायला मिळाली होती. ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अजय देवगनचा ‘सिंघम’ आणि रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ चित्रपटाची झलक पहायला मिळणार आहे. सध्या अक्षय कुमार ‘केसरी’ चित्रपटामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह परिणीती चोप्रा मुख्य भुमिकेत दिसणार आहे.