रोहित शेट्टीच्या सिम्बा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. त्यानंतर चित्रपटाच्या शेवटी रोहित शेट्टीने त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘सुर्यवंशी’ जाहिर केले. तसेच चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची घोषणाही केली. परंतु चाहत्यांना उत्सुकता होती ती चित्रपटातील अभिनेत्रीची.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शेट्टीच्या ‘सुर्यवंशी’ चित्रपटात कतरिना कैफ दिसणार आहे. तब्बल ९ वर्षानंतर कतरिना आणि अक्षयची जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. तसेच रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार हे देखील पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. सूत्रांनुसार अक्षय कुमारने चित्रपटातील अभिनेत्रीसाठी कतरिना कैफचे नाव सुचवले आहे. याआधी चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस झळकणार असल्याची चर्चा होती.

या आधी २०१०मधील ‘तिस मार खान’ हा चित्रपट अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा शेवटचा एकत्र चित्रपट होता. त्यानंतर ही जोडी सोनरी पडद्यावर पहायला मिळाली नव्हती. आता ‘सुर्यवंशी’मध्ये त्यांना पुन्हा एकदा एकत्र पहायला मिळणार आहे. सध्या कतरिना ‘भारत’ चित्रपटामध्ये व्यग्र आहे तर अक्षय कुमार ‘हाऊसफुल ४’,’गुड न्युज’,’मिशन मंगल’ प्रोजेक्टवर काम करत आहे.