बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. अक्षयचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी अमृतरसमध्ये एका पंजाबी कुटूंबामध्ये झाला. सध्या अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा आणि यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘मिशन मंगल’ नंतर अक्षय कुमार कोणता नवा चित्रपट घेऊन येणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. आज वाढदिवसानिमित्त अक्षयने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचा हा चित्रपट म्हणजे चाहत्यांसाठी वाढदिवसानिमित्त दिलेली एक भेटच म्हणावे लागेल.

अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच अक्षयच्या करिअरमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘पृथ्वीराज’ असे असून चित्रपट दिवाळी २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत.

‘मला माझ्या वाढदिवशी पहिल्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आनंद होत आहे. माझी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेसाठी निवड केल्याबद्दल मनापासून आभार. माझ्या करिअरमधील मोठ्या चित्रपटांपैकी पृथ्वीराज चौहान हा एक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करणार असून चित्रपट २०२०च्या दिवाळी मध्ये प्रदर्शित होणार आहे’ असे अक्षयने टीझर शेअर करत कॅप्शन दिले आहे.