गेल्या काही काळापासून सतत चर्चेत राहिलेल्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचं चित्रीकरण अखेर पूर्ण झालं आहे. तसंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सोबतच चित्रपटाचं नवीन पोस्टरदेखील शेअर केलं आहे. तसंच अभिनेता अक्षय कुमार यानेदेखील ट्विट करुन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

लॉकडाउननंतर विदेशात चित्रीकरण होणारा ‘बेल बॉटम’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचं स्कॉटलॅण्डमध्ये चित्रीकरण पार पडलं असून हा चित्रपट २ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रंजित तिवारी यांनी केलं आहे.

“एकट्याने केलं असतं तर फार थोडंथोडकं झालं असतं. मात्र, सगळ्यांनी मिळून केल्यामुळे मोठं काम पार पडलं आहे. हे टीमवर्क आहे. या टीममधील प्रत्येकाचे मनापासून आभार. बेल बॉटमचं चित्रीकरण पूर्ण झाल आहे. हे पाहा नवीन पोस्टर. हा चित्रपट २ एप्रिल २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल”, अशी पोस्ट अक्षयने शेअर केली आहे.

दरम्यान, या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या वर्षात एकापेक्षा एक हिट चित्रपट देण्यास तयार आले. येत्या काळात ‘सूर्यवंशी’ ‘लक्ष्मी बम’, ‘पृथ्वी राज’ ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ असे एकूण सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.