‘हॉलीडे’ चित्रपटातील सैनिकाच्या भुमिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बॉलीवूड अॅक्शन स्टार अक्षय कुमार पुन्हा एकदा दहशतवादासारख्या संवेदनशील समस्येवर भाष्य करणारा ‘बेबी’ चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे. दहशतवादाच्या समस्येवर उघडपणे चर्चा व्हावी आणि जनजागृती करण्यासाठी अशा विषयांवर चित्रपट होणे आवश्यक असल्याचे अक्षय यावेळी म्हणाला. तसेच ‘बेबी’ चित्रपट दहशतवादावर मुक्तपणे भाष्य करणारा चित्रपट असल्याचेही तो पुढे म्हणाला.
हॉलीडे चित्रपटाची कथा ‘स्लिपर सेल्स’चा वाढत्या प्रादुर्भाव आणि त्यापासून निर्माण होणाऱया संकटांवर आधारीत होती तर, ‘बेबी’ चित्रपटाची कथा देशातील सामान्य नागरिकांना दहशतवादाला कसे सामोरे जावे लागते आणि सरकार दहशतवाद रोखण्यासाठी कसे प्रयत्न करते? याचे वास्तव दाखवणारी असणार आहे. चित्रपटात एका गुप्तहेराची भूमिका साकारत असल्याचे अक्षयने यावेळी सांगितले. यात ‘बेबी’ हे आमच्या गटाचे नाव असून यामध्ये माझ्यासोबत अनुपम खैर, राणा दग्गुबाती यांचा समावेश असल्याचीही माहिती अक्षयने दिली. बेबीसारखा चित्रपट केल्याने आनंदी असल्याचे सांगत अक्षय म्हणाला की, ‘बेबी’ उल्लेखनीय चित्रपट असून दहशतवाद या सध्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर खुलेआमपणे भाष्य करणारा हा चित्रपट आहे. दहशतवादाचे वास्तव दाखवून देणाऱया काही सत्य घटनांवर ‘बेबी’ चित्रपटाची कथा आधारलेली आहे. या चित्रपटातून दहशतवादाविरोधी जनजागृती होणार असल्याचा आनंद आहे.”