‘डब्ल्यूडब्ल्यूई’मधील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या अंडरटेकरने तब्बल २७ वर्षानंतर साहसी खेळाच्या मैदानातून निवृत्त घेतली. अंडरटेकरने ट्रिपल एच, द रॉक, खली, शॉन मायकल, हल्क होगन यांच्यासोबत केलेल्या फाइट तुम्हाला आठवत असतील. पण बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने अंडरटेकरला दिलेली टक्कर तुम्हाला आठवते का? बॉलिवूडमधील आपल्या अॅक्शनने प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारने चित्रपटामध्ये अंडरटेकरशी दोन हात केले होते.

अंडरटेकरने त्याच्या कारकीर्दीत एकूण २२७४ सामन्यांत १७१७ सामने जिंकले असून, ४६६ सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला आहे. खऱ्या खुऱ्या मैदानात विरोधकाला हटके स्टाइलने पराभूत करणाऱ्या अंडरटेकरच्या नावाचा दबदबा अक्षय कुमारच्या ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटात पाहायला मिळाला होता. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या चित्रपटात नकली अंडरटेकरला अक्षयने खांद्यावर उचलून फेकल्याचे दाखविण्यात आले होते. या चित्रपटात अंडरटेकरची भूमिका ब्रायन लीने साकारली होती. या चित्रपटातील नकली अंडरटेकरच्या सीनमध्ये चित्रपटातील खलनायिका रेखा अक्षय कुमारला अंडरटेकरच्या ताकदीचा दाखला देताना सुद्धा पाहायला मिळाले.

चित्रटातील अंडरटेकरसोबतच्या लढाईमध्ये अक्षयच्या खांद्याला दुखापत देखील झाली होती. त्यामुळे नकली अंडरटेकरला जमिनीवर पटकविल्यानंतर अक्षयला पूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण हे उशीच्या आधाराने पूर्ण करावे लागले होते. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रेखा खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. अंडरटेकरचं खरं नाव मार्क कॅलवे आहे.  २४ मार्च १९६५ ला त्याचा जन्म अमेरिकेत टेक्सासमध्ये झाला होता. टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये त्याने ‘स्पोर्टस मॅनेजमेंट’चं शिक्षण घेतलं. त्याला खेळांची प्रचंड आवड होती. ‘डब्ल्यूडब्ल्यूई’मधील खेळामध्ये त्याने त्याचा मोठा दरारा पाहायला मिळाला.