बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाला देखील करोना विषाणूची लागण झाली का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. देशभरात सध्या करोना विषाणूची दहशत आहे. त्यामुळे रुग्णालयात जाणारा प्रत्येक जण जणू करोनाची चाचणी करण्यासाठीच तिथे जात आहे, अशा आवेगात त्याच्याकडे पाहिले जात आहे. असाच काहीसा प्रकार ट्विंकलच्या बाबतीतही घडला आहे.

ट्विंकल पती अक्षय कुमारसोबत रुग्णालयात गेली होती. अक्षयसोबत रुग्णालयात जात असतानाचा एक व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील पोस्ट केला. हा व्हिडीओ अल्पावधीत सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला. व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला ‘ट्विकला करोना विषाणूची लागण तर झाली नाही ना?’ असा प्रश्न पडू लागला. पण याचं उत्तर स्वतः ट्विंकलनं या व्हिडीओमध्येच दिलं आहे.

खरं तर ट्विंकलच्या पायाचं हाड मोडल्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात जावं लागलं. संपूर्ण देशात लॉकडाउन आहे. सर्व नागरिकांना घरातच बसण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे ट्विंकलने आपल्या ड्रायव्हरला सुट्टी दिली आहे. ड्रायव्हर नसल्यामुळे अक्षयने स्वत: गाडी चालवून तिला रुग्णालयात नेले.