बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला भेटण्याची हौस एका चाहत्याला चांगलीच महागात पडली आहे. अक्षय कुमारला भेटण्यासाठी त्याच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केलं असता न्यायलयीन कोठडीत सुनावण्यात आली.

भुवनेश्वर येथे दुधाचा धंदा करणारा अंकित गोस्वामी खिलाडी अक्षय कुमारचा चाहता आहे. मात्र आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्याची इच्छा त्याला चांगलीच महागात पडली. यासाठी अंकित भुवनेश्वर येथून मुंबईत आला होता. गुगल मॅपवरून त्याने अक्षय कुमारच्या जुहू येथील बंगल्याचा पत्ता मिळवला आणि तिथे पोहोचला.

अक्षय कुमारला भेटण्यासाठी अंकित कोणत्याही परवानगीविना बंगल्यात शिरला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला अडविले आणि शाब्दिक चकमक उडाली. यानंतर मुंबई पोलिसांनी मध्यस्थी केली असता अंकितने त्यांच्याशीदेखील हुज्जत घातली. जुहू पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायलयात हजर केलं असता न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.