बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमारसाठी २०१९ हे वर्ष दमदार गेलं. या वर्षात त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवत असतानाच छोट्या पडद्यावरही अक्षयने कमाल केली आहे. त्याचा ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट छोट्या पडद्यावर २०१९ या वर्षातील सर्वाधिक टिआरपी मिळवणारा चित्रपट ठरला आहे. ‘हाऊसफुल’ या मालिकेतील हा चौथा चित्रपट असून बॉक्स ऑफिसवर त्याने आतापर्यंत कमाईचा २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

अक्षयच्या ‘हाऊसफुल ४’ची टिआरपी रेटिंग सहा इतकी असून याआधी ‘धडक’ची पाच आणि ‘टोटल धमाल’ची ४.८ इतकी आहे. बॉलिवूड चित्रपटांचे ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर’ प्रेक्षकांकडून सर्वाधिक पाहिले जातात. २०१९ या वर्षाअखेर कॉमेडीचा भरणा असलेला ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर लगेच तो टीव्हीवर दाखवण्यात आला. त्यामुळे टीआरपीचा हा आकडा सर्वाधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा : अभिनेत्रीची बॅटिंग पाहून युवराज सिंग झाला थक्क; म्हणाला…

फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल यांच्यासोबत क्रिती सनॉन, क्रिती खरबंदा आणि पूजा हेगडे यांच्या भूमिका आहेत. यापूर्वीच्या ‘हाऊसफुल’च्या कथानकांप्रमाणे इकडे ‘हाऊसफुल ४’मध्ये देखील नायकांना त्यांच्या-त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचे आहे. पण, या लग्नात येणाऱ्या विघ्नावर हा संपूर्ण चित्रपट बेतलेला आहे.