प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘हाऊसफुल’ फ्रँचाइजीमधला चौथा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हाऊसफुल ४’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे. जवळपास साडेतीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पुनर्जमावर आधारित कथेतून भन्नाट विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विशेष म्हणजे यातील बरीच दृश्ये पाहून आपल्याला ‘पद्मावत’ची या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
एकीकडे पंधराव्या दशकातील तीन जोड्यांची प्रेमकहाणी आणि नंतर त्यांचा झालेला पुनर्जन्म, त्यातही पुनर्जन्मात झालेली जोड्यांची अदलाबदल असा बराचसा गोंधळ यात पाहायला मिळतो. यातील काही दृश्ये ‘पॉझ’ करून पाहिली संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ चित्रपटातील दृश्यांशी किंवा कलाकारांच्या लूकशी साधर्म्य सहज आढळतो. ‘पद्मावत’मधील शाहिद कपूर व दीपिका पदुकोणचा एक रोमॅण्टिक सीन ‘हाऊसफुल ४’च्या ट्रेलरमध्ये थोडा विनोदी तडका देऊन दाखवला गेला आहे. इतकंच नव्हे तर ट्रेलरमध्ये क्रिती सनॉनची एण्ट्री पाहिली तर ‘पद्मावत’मधील दीपिकाच आठवते. क्रितीसोबतच पूजा हेगडे व क्रिती खरबंदा या अभिनेत्रीसुद्धा राजपूत पोशाखात पाहायला मिळतात.
‘हाऊसफुल ४’मध्ये यंदा नवीन एण्ट्री पाहायला मिळते ती म्हणजे अभिनेता राणा डग्गुबतीची. या चित्रपटातील राणाचा लूक ‘पद्मावत’मधील अल्लाउद्दीन खिल्जीसारखाच आहे.
फरहाद सामजी दिग्दर्शित ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटात रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा डग्गुबती, चंकी पांडे, सौरभ शुक्ला, जॉनी लिव्हर, अक्षय कुमार, क्रिती सनॉन, क्रिती खरबंदा, पूजा हेगडे अशी कलाकारांची फौजच आहे. हा चित्रपट येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 27, 2019 6:12 pm