बुधवारी अक्षय कुमार ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शो’च्या चित्रीकरणादरम्यान अचानक आजारी पडला. तो यशराज स्टुडिओमध्ये या रिअॅलिटी शोचे चित्रीकरण करत होता. त्याची तब्येत बिघडते असे दिसल्यावर सेटवर डॉक्टरांनाही बोलावण्यात आले. अक्षयला अंगदुखीचा त्रास असून थोडा तापही होता. पण तरीही त्याने चित्रीकरण थांबवू दिले नाही. संपूर्ण चित्रीकरण संपवूनच तो घरी गेला. अक्षय नेहमीच त्याच्या प्रामाणिकपणासाठी आणि शिस्तीसाठी ओळखला जातो. तो आपल्यामुळे चित्रीकरण खराब व्हावे होऊ नये याची पूर्णखबरदारी घेतो.

दरम्यान, ४८ व्या ‘इफ्फी २०१७’ मध्ये स्मृती इराणी आणि अक्षय कुमारने अमिताभ बच्चन यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान केला. त्यावेळी पुरस्कार देण्यासाठी बिग बींना व्यासपीठावर बोलावण्यात आले. तेव्हा अक्षय त्यांना घेण्यासाठी व्यासपीठावरुन खाली आला आणि त्याने बिग बींचे पाय धरले. अक्षयने त्यांच्या पाया पडताच बिग बींनी त्याला आपुलकीने मिठी मारली. तेव्हा उपस्थितांमध्येही अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मितहास्य खुलल्याचे पाहायला मिळाले. अक्षय कुमार बिग बींच्या पाया पडतानाचे फोटो सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाले. अनेक नेटकऱ्यांनी खिलाडी कुमारची प्रशंसा करत त्याला दाद दिली. पण, त्यानंतर बिग बींनी मात्र एक अनपेक्षित ट्विट करत सर्वांचेच लक्ष वेधले. एका ट्विटर युजरचे ट्विट रिट्विट करत बिग बींनी लिहिले, ‘अक्षय जे केलंस ते योग्य नाही, मी त्यावेळी संकोचलो होतो.’

अक्षयच्या ‘२.०’ आणि ‘पॅडमॅन’ या सिनेमांचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने पॅडमॅनचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले होते. तर ४०० कोटी रुपयांचे बजेट असलेला ‘२.०’ आशियातील आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा म्हणून ओळखला जात आहे. या सिनेमात रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅक्सन यांच्याशिवाय सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा जगभरात सुमारे ७००० स्क्रीन्सवर दाखवण्यात येईल.