बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा काही दिवसांपासून होत्या. या चर्चांवर अक्षयनं अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणूक लढवण्याचा विचार नसल्याचं अक्षयनं स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री करिना कपूर, अक्षय खन्ना, अक्षय कुमार, संजय दत्त यांसारखे कलाकार निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या, करिना निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आता अक्षयनंही आपण निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘राजकारणात येण्याचा माझा विचार नाही. जे मी माझ्या चित्रपटातून करतो आहे ते काम राजकारणातून कधीही साध्य होणार नाही’ असं अक्षय म्हणाला.

अक्षय कुमार अमृतसर मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारला मतदानाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे अक्षय राजकारणात येतोय चर्चा होत्या मात्र अक्षयनं त्या अफवा असल्याचं म्हटलं आहे.