बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारची प्रस्तुती असलेल मराठी चित्रपट ‘चुंबक’चा सध्या चित्रपटसृष्टीत मोठा बोलबाला आहे. अक्षयने सोशल मिडियाचा आधार घेत हा चित्रपट प्रस्तुत करत असल्याची घोषणा केली आणि या चर्चेला उधाण आले. ‘चुंबक’ चित्रपटातील आता आणखी दोन व्यक्तिरेखांची पोस्टर प्रदर्शित झाली आहेत. प्रसन्ना ठोंबरे आणि ‘डिस्को’ या त्या दोन व्यक्तिरेखा आहेत. प्रसन्ना ठोंबरे ही व्यक्तिरेखा दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे ख्यातनाम गीतकार, गायक, संगीतकार आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. तर ‘डिस्को’ ही दुसरी व्यक्तिरेखा मूळचा कोल्हापूरचा असलेल्या संग्राम देसाई या युवकाने साकारली आहे.

स्वानंद किरकिरे हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत पहिल्यांदाच दिसणार आहेत. सोलापूरमधील एका छोट्याशा गावातील गतिमंद व्यक्तीची भूमिका त्यांनी साकारली आहे. नुकत्याच झालेल्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन प्राप्त झाले आहे. याविषयी स्वानंद किरकिरे म्हणाले की, ‘चित्रपटाच्या संगीतासाठी ही टीम मला भेटत आहे असे मला सुरुवातीला वाटले. पण मला त्यात मुख्य भूमिका साकारावी लागणार, असे जेव्हा कळले तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. ही भूमिका म्हणजे एक आव्हान होते. पण पटकथा आवडल्याने मी होकार दिला.’

या भूमिकेसाठी त्यांनी कशाप्रकारे मेहनत घेतली याविषयी ते सांगतात की, ‘एक निरागस आणि गतिमंद पुरुषाची व्यक्तिरेखा मला साकारायची होती. आपल्या आसपासच्या लोकांचे निरीक्षण करत आणि त्याच्या जोडीला या क्षेत्रातील डॉक्टर आणि समुपदेशक यांच्याशी चर्चा करत ही व्यक्तिरेखा मी साकारली आहे. ही व्यक्तिरेखा आम्ही एक एक वीट रचावी तशी अभ्यासत आणि साकारात गेलो.’

वाचा : श्रीदेवी यांच्या सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार दीपिका?

प्रसन्नाबरोबर दुसरे पोस्टर आहे ते ‘डिस्को’ची भूमिका साकारणाऱ्या संग्राम देसाईचे. परराज्यातून आलेल्या आणि मुंबई मोबाईल रिपेअरिंगचे काम करणाऱ्या तरुणाची ही व्यक्तिरेखा आहे. कास्टिंग टीममधील रोमिल मोदी आणि तेजस ठक्कर यांना संग्राम कोल्हापूरजवळील एका गावात अगदी अनपेक्षितपणे सापडला. परराज्यातून आलेल्या पण हुशार अशा मोबाइल मेकॅनिकची भूमिका साकारण्यासाठी संग्रामला शहरातील व्यक्तिरेखांचा अभ्यास करावा लागला. त्यासाठी तो मुंबईत एक महिना राहिला. त्यासाठी दिग्दर्शक संदीप मोदी आणि लेखक सौरभ भावे यांनी त्याला खूप मदत केली. या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना संग्रामने मोबाईल दुरुस्त करण्याचे थोडे प्रशिक्षणही घेतले.

अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला ‘चुंबक’ संपूर्ण महाराष्ट्रात २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.