बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांचे सिक्वल येणं ही गोष्ट काही हल्ली नवीन नाही. गेल्या काही वर्षात प्रेक्षकांच्या मागणीमुळे अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वल आले आहेत. ‘जुडवा २’, ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ ही यातीलच काही उदाहरणं. याच यादीत आता ‘रावडी राठोड’चे नाव समाविष्ट होण्याची शक्यता आहे. अक्षय कुमार व सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रावडी राठोड’ हा अॅक्शन कॉमेडी चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. लवकरच या चित्रपटाचा सिक्वल येण्याच्या चर्चा आहेत.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, ‘रावडी राठोड २’ लिखाणाच्या प्रक्रियेत असून या चित्रपटात पुन्हा एकदा अक्षय कुमारच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे असं सांगण्यात येतंय. अक्षय कुमारच्या चित्रपटांमध्ये विनोद असतो. तो इंडस्ट्रीतील अष्टपैलु अभिनेत्यांपैकी एक आहे. या चित्रपटात पुन्हा सोनाक्षीच प्रमुख भूमिकेत आहे की, दुसरी कोणती अभिनेत्री हे पाहणे उत्सुकतेचे आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षात सुरु होईल असे सांगण्यात येत आहे. ‘रावडी राठोड’ ‘विक्रमार्कुडु’ या चित्रपटाचा रिमेक होता. दमदार कथानकासोबतच या चित्रपटाची गाणी सुद्धा विशेष गाजली होती. आता या चित्रपटाच्या सिक्वल म्हणजे अक्षय कुमारला बघणे त्याच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का आहे.

अक्षय कुमार सध्या बँकॉकमध्ये कतरीना कैफसोबत ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कतरीना व अक्षयची जोडी बऱ्याच वर्षांनी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.