अविश्वसनीय अशा शौर्यगाथेची कथा ‘केसरी’च्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षयने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यावेळी बोलताना यापूर्वी चित्रपटसृष्टीत अशा धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती झाली नाही ही खरंतर खूप मोठी शोकांतिका आहे, असं तो म्हणाला आहे.
सारागढीच्या युद्धाविषयी आजवर बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या असून भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातही या युद्धाविषयी बरेच उल्लेख असल्याचं पाहायला मिळतं. मात्र या इतिहासावर आधारित एकाही चित्रपटाची निर्मिती आतापर्यंत झाली नाही. त्यामुळे अक्षयच्या आगामी केसरी या चित्रपटात या इतिहासावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

“सारागढीचं युद्ध हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी लढाई असल्याचं म्हटलं जातं. मात्र आतापर्यंत इतिहासात नोंद होणाऱ्या या घटनेवर आधारित एकही चित्रपट तयार करण्यात आला नाही. खरंतर हा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रुपेरी पडदा हे योग्य माध्यम आहे. मात्र या इतिहासाची दखल कलाविश्वाकडून घेतली गेली नाही, यापेक्षी मोठी शोकांतिका नाही”, असं अक्षय म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, “मला स्वत: ला या घटनेविषयी एवढी माहिती नव्हती. मात्र चित्रपट करत असताना या गोष्टींचा उलगडला झाला. मला या चित्रपटातून खूप काही शिकता आलं. खरंतर डोळ्यासमोर एवढं मोठं शत्रूंचं सैन्य पाहुन आपल्या २१ सैनिकांना पळ काढण्याची संधी होती. मात्र त्यांनी असं न करता या शत्रूला सामोरे गेले. ही लढाई आपण जिंकणार नाही हे त्यांना माहित होतं. परंतु तरीदेखील त्यांनी पळपुटेपणा न करता संघर्ष केला”.

दरम्यान, ३६ व्या शीख रेजिमेंटच्या २१ सैनिकांनी दहा हजार अफगाण सैनिकांना दिलेला लढा ‘केसरी’ या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. आतापर्यंत या चित्रपटातील काही पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. हा ट्रेलर आणि पोस्टर पाहुन प्रेक्षकांची या चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.