जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झली. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पीओके घुसल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांनी मोठ्या नुकसानीचे वृत्त फेटाळले आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी सीमा पार करून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.

दरम्यान भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. राजकीय नेत्यांसहित बॉलिवूड मंडळींनीही ट्विट करत भारतीय हवाई दलाचं कौतुक केलं आहे. यामध्ये अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांचा समावेश आहे.

खिलाडी अक्षय कुमारनेही ट्विटरच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाला सलाम करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्याला भारतीय  हवाई दलाचा अभिमान असल्याचं अक्षयने म्हटलं आहे. आतमध्ये घुसून मारा, आता अजिबात शांत बसायचं नाही असंही अक्षय कुमारने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.